सात दिवसात जनसुनावणी घ्या; एआयएसएफचा निर्धार

सात दिवसात जनसुनावणी घ्या; एआयएसएफचा निर्धार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत पारंपरिक तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांच्या शुल्क माफीकरिता नेमलेल्या महाराष्ट्र शासनाच्या समितीने नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालय येथे 'जन सुनवाई'चा कार्यक्रम जाहीर करेपर्यंत दि.२ ऑगस्ट २०२१ पासून अखिल भारतीय विद्यार्थी महासंघाच्या (AISF) वतीने बेमुदत साखळी उपोषण सुरु आहे...

१० दिवस उलटूनही प्रशासनामार्फत उपोषणाची दखल घेतली जात नसल्याने येत्या ७ दिवसात शुल्क माफीकरिता जनसुनावणी घेतली नाही तर नाशिक शहरात एआयएसएफमार्फत विविध भागधारकांना सहभागी करून जनसुनावणी घेण्यात येईल, असा निर्धार ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशनच्या ८६ व्या वर्धापनदिनी घेण्यात आला.

तसेच जनसुनावणीपर्यंत साखळी उपोषणदेखील सुरू ठेवणार असल्याची माहिती एआयएसएफचे राज्याध्यक्ष विराज देवांग व जिल्हाध्यक्ष अविनाश दोंदे यांनी हुतात्मा स्मारक येथे आयोजित कार्यक्रमात दिली आहे.

यावेळी जयंत विजयपुष्प, प्रज्वल खैरनार, प्राजक्ता कापडणे, सागर जाधव, कैवल्य चंद्रात्रे, शंतनू भाले, अल्फिया शेख, अजिंक्य म्होडक उपस्थित होते.

लॉकडाऊन काळात शाळा व महाविद्यालय पूर्णतः बंद असल्याने कोणतेही इन्फ्रास्ट्रक्चर व सुविधा यांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळाला नाही. या पार्श्वभूमीवर संपूर्ण फी वसूल करण्याचे संस्था चालकांचे धोरण हे बेकायदेशीर असून याविरुद्ध एआयएसएफमार्फत एप्रिल महिन्यापासून आंदोलन चालविण्यात येत आहे.

समितीत कोण आहेत सदस्य

अध्यक्ष चिंतामणी जोशी (सचिव, शुल्क प्राधिकरण), डॉ.धनराज माने (संचालक, उच्च शिक्षण संचालनालय, पुणे), डॉ.अभय वाघ (संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, मुंबई), डॉ.बळीराम गायकवाड (कुलसचिव, मुंबई विद्यापीठ, मुंबई) तसेच सहसचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांचा सदस्य म्हणून समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com