
शिरवाडे वाकद । वार्ताहर Shirvade Vakad
प्रचंड इच्छाशक्ती असली की माणूस प्रतिकूल परिस्थितीवरही चांगल्या पद्धतीने मात करू शकतो याचे आदर्श उदाहरण म्हणजे शिरवाडे ( shirvade )येथील शेळके बंधू. येथील रमेश केदू शेळके व सुरेश केदू शेळके यांनी आपल्या क्षारयुक्त जमिनीत उत्तम प्रतीचे टोमॅटो पीक (Good quality tomato crop in saline soil)घेऊन इतर शेतकर्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे.
शेळके बंधू यांची जमीन अतिशय क्षारयुक्त, त्यात पाणीही खराब. जमिनीचा सामू दहाच्या वर तसाच पाण्याचाही सामू दहाच्या वर. त्यामुळे कोणत्याही पिकाची वाढ होत नसे. या जमिनीत केवळ जनावरांचा चारा व गहू हेच पीक येत होते. त्यामुळे शेळके बंधू हतबल झाले होते. नगदी पिकाशिवाय आर्थिक स्थिती सुधारणार नाही हे त्यांनी ओळखले आणि या परिस्थितीवर मात करण्याचे ठरवले.
त्यासाठी त्यांनी सर्वप्रथम गोदावरी कालव्यावरून गोड पाणी उपलब्ध केले व ते एका तळ्यात साठवले. त्यामुळे पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटला. मात्र जमिनीचा सामू जास्त होता. पिकाला पाणी दिले तरी जमिनीवर पांढरा थर येत असे. अशा परिस्थितीत त्यांनी टोमॅटो लागवड केली. त्यासाठी सुरुवातीला 25 गुंठे जमिनीत दोन टन शेणखत टाकून ट्रॅक्टरच्या सहाय्याने उभी आडवी फणणी केली. त्यानंतर चार फुटावर मातीचे वरंबे तयार केले. त्यावर खतांचा मूळ डोस म्हणून रासायनिक खते न टाकता गांडूळ खत व इतर सेंद्रीय खते टाकली. यासाठी त्यांना श्री स्वामी समर्थ गांडूळ प्रकल्प (धामोरी) यांचे मार्गदर्शन लाभले.
वरंब्यावर ठिबक सिंचनच्या सहाय्याने सिंचन व्यवस्था केली. ठिबक सिंचनामुळे अल्प पाण्याचा वापर करून ते फक्त मुळाशी कसे राहील याची व्यवस्था केली. त्यावर प्लॅस्टिकचे आच्छादन केले. टोमॅटो लावताना सेमीनास कंपनीचे आर्यमान या वाणाची निवड केली. टोमॅटोवाढीसाठी त्यांनी रासायनिक खतांचा वापर टाळून वेळोवेळी गांडूळ खत आणि पाण्याचा वापर केला. त्यामुळे मुळांची संख्या भरपूर प्रमाणात वाढली.
जिवामृताची फवारणी केली. त्यामुळे त्यांचे टोमॅटो पीक अवघ्या 50 दिवसांत बहरून आले आहे. गतवर्षी त्यांनी याच पद्धतीने एकरी सरासरी 1200 क्रेटस् टोमॅटो उत्पादन काढले होते. मात्र यावर्षी ते उत्पादनात उच्चांक करतील असा टोमॅटो प्लॉट बघून अंदाज येतो. यातून त्यांनी सेंद्रीय शेती ही काळाची गरज असून शेतकर्यांनी आता सेंद्रीय शेतीकडे वळावे, असा संदेश त्यांनी दिला आहे.