युरिया खत
युरिया खत
नाशिक

युरिया गायब झाल्याने शेतकरी हवालदिल

खरिप हंगामाला खत टंचाईचे ग्रहण

Abhay Puntambekar

निफाड। प्रतिनिधी Niphad

यावर्षी प्रारंभीच पावसाने समाधानकारक हजेरी लावली असली तरी देखील आता खरिप हंगामातील पीकांना खत देण्याच्या वेळेसच बाजारातून युरिया गायब झाल्याने शेतकर्‍यांची डोकेदुखी वाढली आहे. दरवर्षी खते व औषधांच्या किंमती वाढत असतांना देखील अनेकवेळा त्याचा तुटवडा जाणवत असतांनाच आता नित्कृष्ठ बियाणे व खतांचा सामना देखील शेतकर्‍यांना करावा लागत असल्याचे दिसत आहे.

यावर्षी खरिप हंगामासाठी कृषी विभागाने ३५ हजार ४०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दीष्ठ ठेवले होते. तर त्यासाठी ३८८५० मे. टन खतांची मागणी नोंदविण्यात आली होती. यावर्षी करोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता कृषी विभागाने शेतकर्‍यांसाठी खते व बियाणांचा थेट बांधावर पुरवठा करण्याचे उद्दीष्ठ ठेवून त्यादृष्टीने कार्यवाही केली. मात्र यावर्षी अनेक शेतकर्‍यांनी पेरलेले सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याने त्यांना दुबार पेरणी करावी लागली. मात्र आता या पीकांना खते देण्याची वेळ आली असतांनाच बाजारातून युरिया गायब झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

परिणामी शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी निफाड शेतकरी संघाचे चेअरमन राजेंद्र डोखळे यांनी निफाड शेतकरी संघातून युरिया घेवून जाण्याचे शेतकर्‍यांना आवाहन केले आहे. शेतकरी संघात जर युरिया खत आहे तर मग इतर कृषी विक्रेत्यांकडे युरिया गायब कसा होतो की जाणून-बुजून हंगामात खतांची कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते की काय असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे. कृषी विभागाचे मते यावर्षी खरिप हंगामासाठी ३८८५० मे. टन खतांची मागणी नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी १३८३९ मेे.टन खत उपलब्ध होवून वाटप झाले आहे तर काही ठिकाणी वाटप होत आहे. यात युरियाची देखील १५०३२ मे. टन मागणी नोंदविण्यात आली होती.

आत्तापर्यंत ७ हजार मे. टन युरिया खत वाटप करण्यात आले असून तालुक्यात खतांची टंचाई नाही मात्र आजही खत विक्रेत्यांच्या दुकानासमोर शेतकर्‍यांच्या रांगा दिसून येत आहेत. दरवर्षीच शेतकर्‍यांना खत व बियाणे टंचाईचा सामना करावा लागत असल्याने कृषी विभागाने कृषी विक्रेत्यांचा स्टॉल वेळोवेळी तपासणे गरजेचे आहे. तसेच जे दुकानदार खतांची व बियाणांची साठेबाजी करीत असल्याचे दिसतील त्यांचेवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.

सोमवारपासून सर्वच दुकानात युरिया खत

गेल्या चार दिवसांपासून निफाड शहरात संचारबंदी होती. दुकाने बंद मुळे शेतकर्‍यांना खते घेता आली नाही. आता आपल्याकडे ४५० मेे. टन युरिया आला आहे. निफाड शेतकरी संघाच्या सर्व शाखा, ओझर शेतकरी संघाच्या सर्व शाखा, लासलगाव संघाच्या सर्व शाखा यासह तालुक्यातील सोसायट्या यांचेकडून आज सोमवारपासून युरियाचा मुबलक पुरवठा होईल. सिन्नर व येवला तालुक्यातील शेतकरी कांदा विक्रीसाठी तालुक्यात येतात व जातांना खते घेऊन जातात. तालुक्यात कोठेही खत टंचाई नाही. तसेच शनिवारपासून पुन्हा खतांची रॅक लागली आहे. त्यामुळे तालुक्यात खतांचा तुटवडा नाही.

बाळासाहेब खेडकर, कृषी अधिकारी पं.स. निफाड

खतांची आकडेवारी मे. टन मध्ये

मागणी केलेली खते पुरवठा झालेली खते

युरिया- १५०३२ मे. टन ७००० मे. टन

डी.ए.पी- ४३८१ मे. टन २०२८ मे. टन

एम.ओ.पी- १०३० मे. टन ४७७ मे. टन

सुपर फॉस्फेट- ५३९५ मे. टन २४९९ मे. टन

संयुक्त खते- १२७४१ मे. टन ५९०० मे. टन

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com