बेमोसमी पावसाने शेतकरी चिंताक्रांत

कांद्याच्या उळ्यांवर रोगराईचे आक्रमण; शेतात-खळ्यातील मका भिजला
बेमोसमी पावसाने शेतकरी चिंताक्रांत

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

शहरासह तालुक्यात काल रात्री व आज पहाटे झालेल्या बेमोसमी पावसामुळे (Unseasonal rain) सखल भागात पाणी साचून पुन्हा चिखलाचे साम्राज्य पसरले. या पावसासह ढगाळ वातावरणाच्या (Cloudy weather) निर्मितीमुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव (Outbreaks of diseases) पसरू लागला आहे.

विशेषत: लागवड केलेला उन्हाळ कांदा (Summer onion) तसेच तयार होत असलेली कांद्याची उळे पिवळी पडून बुरशीजन्य आजाराने (Fungal diseases) बाधीत होत असल्याने शेतकरी (farmers) धास्तावले आहेत. अतीवृष्टीने (heavy rain) कापणीवर आलेल्या पिकांची वाताहत केल्याने खरीप हंगाम (Kharif season) वाया गेला. रब्बीपासून आशा असतांना बेमोसमी पाऊस व ढगाळ वातावरणात पसरत असलेली रोगराई शेतकर्‍यांची चिंता वाढविणारी ठरली आहे.

शहरात गेल्या काही दिवसापासून तीव्र ऊन व ढगाळ वातावरण असे वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने नागरीक ऑक्टोंबर हिटसारखा अनुभव घेत होते. सायंकाळपासून जाणवत असलेला असह्य उकाडा त्रस्त करून सोडणारा होता. मध्यरात्री बेमोसमी मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावल्याने वातावरण थंड झाल्याने नागरीकांना दिलासा मिळाला. या मुसळधार पावसाने सखल भागात पाणी साचून रस्त्यांवर पुन्हा चिखलाचे साम्राज्य पसरले.

ठिकठिकाणी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये (potholes) पावसाचे पाणी साचून तळ्यांची निर्मिती झाली होती. डी.के. परिसरात भुमीगत गटारीच्या कामामुळे रस्त्यावर आलेल्या काळी माती पुन्हा पावसाच्या पाण्यात भिजल्याने वाहने घसरण्याच्या तसेच पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहने आदळून पडण्याच्या घटना या भागात घडल्याने अनेक नागरीकांना जायबंदी व्हावे लागले.

नित्कृष्ट दर्जाची रस्त्याची कामे केली जात असल्यामुळेच त्रास सहन करावा लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया या भागातील नागरीकांनी व्यक्त केली. पावसाच्या विस्कळीत वेळापत्रकाचा मोठा फटका शेतकर्‍यांना बसला आहे. मृगाच्या हजेरीनंतर पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. नंतर मात्र दमदार पावसाचे आगमन झाल्याने खरीप पिके चांगल्या प्रमाणात बहरल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला होता. मात्र परतीच्या पावसाने घातलेल्या धुमाकुळाने कापणीवर आलेल्या खरीप पिकांची अतोनात हानी केल्याने शेतकर्‍यांना लाखो रूपयांचा फटका बसला होता.

खरीपाचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी रब्बी हंगामाची तयारी शेतकर्‍यांतर्फे सुरू करण्यात आली होती. उन्हाळ कांद्यास चांगला भाव मिळाल्याने यंदा या कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात आहे. अनेक शेतकर्‍यांनी कांद्याची लागवड देखील केली असून अनेकांच्या शेतात उन्हाळ कांद्याची उळे तयार होत आहे. असे असतांना गेल्या काही दिवसापासून तयार झालेल्या ढगाळ वातावरणासह दोन दिवसापासून उघडकीप घेत होत असलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.

तालुक्यातील दाभाडीसह पिंपळगाव (pimpalgaon), जळगाव (jalgaon) गा., रावळगाव, आघार, तळवाडे, झाडी, एरंडगाव, तिसगाव, गिरणारे, कुंभार्डे, झोडगे, गुगुळवाड, अस्ताने, अजंग-वडेल, वडनेर, कौळाणे, वर्‍हाणे, घोडेगाव, निमगाव, मळगाव, खायदे, गिलाणे आदी भागात ढगाळ वातावरणासह झालेल्या बेमोसमी पावसामुळे कांद्याच्या उळ्यांना फटका बसला आहे. ढगाळ वातावरणामुळे कांद्याची उळे पिवळे पडत आहे. त्यामुळे अपेक्षित लागवड होवू शकणार नसल्याने शेतकरी चिंताक्रांत झाले आहेत. बदललेले वातावरण रोगट असल्याने ते कांद्यासाठी घातक असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.

उघड्यावरील मका भिजला

मनमाड । Manmad

शहर परिसराला अवकाळी पावसाने आज पहाटे अक्षरश: झोडपून काढले. शहरासोबत ग्रामीण भागात देखील जोरदार पाऊस झाल्याने उघड्यावर खळ्यात-मळ्यात ठेवलेल्या मक्याला मोठा फटका बसला आहे. हजारो क्विंटल मका (Maize) भिजून खराब झाला त्यामुळे शेतकर्‍यांसोबत व्यापार्‍यांचे मोठे नुकसान झाले. कांदा पिकाला (onion crop) देखील अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला असून लागवडीस तयार असलेली उळे पावसाच्या तडाख्याने जमीनदोस्त झाली. वारंवार येत असलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे बळीराजा अक्षरश: हवालदिल झाले आहेत.

गुरुवारपाठोपाठ शुक्रवारी मध्य रात्रीनंतर पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला मात्र त्यानंतर पावसाचा जोर वाढला आणि पाहता-पाहता मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. तब्बल दीड ते दोन तास दमदार पाऊस झाला. शेतकर्‍यांनी मळ्यात मका काढून ठेवला असून व्यापार्‍यांनी देखील मोठ्या प्रामाणात मका खरेदी करून खळ्यात उघड्यावर ठेवलेला होता. मध्यरात्री पाऊस झाला असल्यामुळे उघड्यावर असलेला सुमारे दीड लाख क्विंटलपेक्षा जास्त मका भिजून खराब झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांसोबत व्यापार्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. मका पाठोपाठ अवकाळी पावसाचा फटका हा कांदा पिकाला देखील मोठ्या प्रमाणात बसला आहे.

कांद्यावर मर रोगाचे आक्रमण

ताहाराबाद । Tarahabad

बागलाण तालुक्यातील ताहाराबाद परिसरात गेल्या आठवडाभरापासून निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे कांद्याचे रोप मोठ्या प्रमाणात मर धरत असल्याने शेतकरी चिंताक्रांत झाला आहे. परिसरात कांदा पिकाचे हुकमी व दर्जेदार उत्पादन शेतकरी बांधव दरवर्षी घेतात. रब्बी हंगामात कांदा पिकाची लागवड होते.

खरिपाची कामे आटोपल्याबरोबर शेतकरी वर्ग शेतीची मशागत करून रब्बी हंगामात लागवड करावयाच्या कांदा पिकाच्या बियाण्यांची पेरणी करतात. कांदा पिकाचे बियाणे उळे पेरणी परिसरात झाली आहे. मात्र गेल्या आठवडाभरापासून वातावरणात झालेल्या बदलामुळे उगवलेले बियाणे मर धरत असल्याने शेतकरी वर्ग चिंताक्रांत झाला आहे. अतिशय महागडे बियाणे खरेदी करून त्याची मर झाल्यास याचा शेतकरी वर्गास मोठा आर्थिक फटका बसणार आहे. शिवाय पुढील कांदा पिकाची लागवड व उत्पादन याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहणार आहे.

Related Stories

No stories found.