ढगाळ हवामानामुळे शेतकरी धास्तावले

कांदा पिकावर बुरशीचा प्रादूर्भाव तर द्राक्षबागांना डाऊनीचा फटका
ढगाळ हवामानामुळे शेतकरी धास्तावले

निफाड । प्रतिनिधी Niphad

गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात असणारे ढगाळ हवामानामुळे (Cloudy weather) कांदा (onion), मका (Maize), हरभरा (Gram), द्राक्षे (Grapes), भाजीपाला (Vegetables) आदी पिकांवर विपरित परिणाम होत असून हातात आलेली पीके वाचविण्यासाठी शेतकर्‍यांची धडपड सुरू आहे.

तालुक्यात सध्या उन्हाळ कांदा (Summer onion) लागवडीचा हंगाम ऐन बहरात आला असतांनाच सततच्या ढगाळ हवामानामुळे कांदा पिकावर बुरशीचा (fungus) प्रादूर्भाव वाढत आहे. जमिनीत बुरशी तयार होत असल्याने कांद्याची पात आडवी पडत असून बियाणे तयार करण्यासाठी ज्या शेतकर्‍यांनी डोंगळे लावले त्यांचीही अवस्था अशी होतांना दिसत आहे. बुरशी बरोबरच कांदा व हरभरा पिकावर मावाचा प्रादूर्भाव वाढत असून महागडी औषधे, कीटकनाशके (Pesticides) फवारून देखील बुरशीसह मावा देखील आटोक्यात येत नसल्याने शेतकर्‍यांची (farmers) डोकेदुखी वाढली आहे.

सध्या अनेक शेतकर्‍यांच्या द्राक्षबागा फुगवणीच्या स्टेजमध्ये असून ढगाळ हवामानामुळे भल्या पहाटे दाट धुक्यामुळे (fog) दवबिंदू (Dew point) द्राक्षघडामध्ये साचून राहत असल्याने घडकूज होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच प्रतिकूल हवामानामुळे द्राक्षबागांवर डाऊनीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. परिणामी अशा द्राक्षबागांना सकाळ-सायंकाळ औषधांची फवारणी करावी लागत आहे. कांदा, भाजीपाला, मका या पिकांवर बुरशीचा मोठा प्रादूर्भाव वाढू लागल्याने कोवळी पाने आडवे पडून या पिकांची वाढ खुंटू लागली आहे. परिणामी हातात आलेले पीक वाया जाण्याचा धोका वाढला आहे.

त्यातच वीज गायब होण्याचे प्रमाण देखील वाढल्याने पिकांना वेळेवर पाणी देण्यास अडचणी येत आहे. साहजिकच ज्या शेतकर्‍यांची कांदा लागवड सुरू आहे अशा शेतकर्‍यांना रात्रीचा दिवस करून पाणी द्यावे लागत आहे. कारण दोन दिवसात नविन कांदा लागवडीला पाणी मिळाले नाही तर संपूर्ण कांदा रोपे जळण्याची शक्यता असते. परिणामी महागडी बियाणे घेवून व खते, औषधे देवून वाचविलेली रोपे आता विजभारनियमनामुळे वाया जावू नये यासाठीं शेतकरी रात्रीच्या वेळेस पिकांना पाणी देत आहेत.

कारण दिवसा वीज गायब होत असल्याने शेतकर्‍यांना रात्रीचा दिवस करण्याशिवाय पर्याय नाही. मागील महिन्यातील अवकाळी पाऊस त्यानंतर दाट धुके अन् आता ढगाळ हवामान. साहजिकच या प्रतिकूल हवामानाचा फटका शेतीपिकांना बसत असून हातात आलेली पीके वाचविण्यासाठी शेतकर्‍यांची कसरत सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com