पावसाचा लपंडाव; शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत

पावसाचा लपंडाव; शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत

त्र्यंबक । Trimbakeshwer

त्र्यंबक तालुक्याच्या अनेक गावांमध्ये शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. मृग नक्षत्राचा कालावधी संपूनही या नक्षत्रात पाऊस न झाल्याने भात पिकांवर संकट कोसळण्याची वेळ आली आहे. तर अनेक ठिकाणी शेतकर्‍यांच्या खरीप पिकांच्या पेरणीची कामे खोळंबली आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पावसाची उघडझाप सुरू असल्याने भात पिकाला नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. यंदाच्या हंगामातील पावसाला सुरवात झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीची कामे सुरु केली होती. परंतु त्यानंतर पाऊस गायब झाल्याने दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले होते.

परंतु पावसाने पुन्हा दमदार आगमन केल्याने पिकाबरोबर शेतकऱ्यांच्या जीवात जीव आला होता. परंतु आता पुन्हा पावसाची उघडझाप सुरु झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. सध्या भात पिकाला जोरदार पावसाची आवश्यकता असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

तर अनेक ठिकाणी अद्यापही पेरणीची कामे रखडली आहेत. त्यामुळे पावसाने पुढील काही दिवस असाच लपंडाव सुरु ठेवला तर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. त्यामुळे शेतकरी पावसाकडे नजरा लावून बसले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com