करोना काळात बळीराजाने अविरतपणे केली देशसेवा : पालकमंत्री छगन भुजबळ

पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध पिक स्पर्धेतील पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सन्मान
करोना काळात बळीराजाने अविरतपणे केली देशसेवा : पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोनाच्या संकट काळात सर्व उद्योग बंद असतांना बळीराजाने मात्र आपल्या शेतीत राबून सर्वांना अन्न, धान्य भाजीपाला पुरविण्याचे काम केले. त्यामुळे कुठल्याही प्रकारची अन्न, धान्याची टंचाई निर्माण झाली नाही. संकट काळातही अविरतपणे शेतात राबणाऱ्या बळीराजाने खरी देशसेवा केली असल्याची भावना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ रुरल टेक्नोलॉजी ॲंड मॅनेजमेंट, ( Dr. Babasaheb Ambedkar Institute of Rural Technology and Management ) त्र्यंबक विद्यामंदिर, मौजे बेळगाव ढगा (Belgaon Dhaga ) येथे पालकमंत्री भुजबळ यांच्याहस्ते राज्यस्तरीय विविध कृषी पुरस्कार प्राप्त १४ शेतकऱ्यांचा तसेच पिक स्पर्धा योजनेतील विजेत्या २५ शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते.

याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर,कृषी व पशु संवर्धन सभापती संजय बनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी लीना बनसोड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिंदे, ॲड.रवींद्र पगार यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक सर्वाधिक काळ राज्याचे मुख्यमंत्री असल्याचे सांगतांना मंत्री भुजबळ म्हणाले, त्यांच्या कार्यकाळात दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत त्यांनी संकर‍ित बियाणे वापरण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांच्या योगदानामुळे कृषी क्षेत्रात मोठी क्रांती झाली. त्यानंतर देशात खासदार शरद पवार यांनी त्यांच्या कार्याचा वसा घेऊन देशभरात कृषी क्रांती घडवून आणली. त्यातून देशाला अन्न, धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केले. त्यामुळे आज जगभरात अन्न, धान्य निर्यात करत आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त आयोजित ‘कृषी दिन’ कार्यक्रम पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

खरीप हंगाम २०२१ यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या महत्वाच्या मोहिमांवर विशेष भर देऊन २१ जून ते १ जुलै २०२१ या कालावधीत कृषी संजीवनी मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली. त्याबद्दल पालकमंत्री भुजबळ यांनी सर्वांचे कौतुक केले.

जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर म्हणाले की, करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व जग थांबलं असतांना शेती व्यवसाय थांबला नव्हता. सर्वांना अन्न, धान्य उपलब्ध व्हावे यासाठी शेतकरी मात्र आपलं काम करत आहे. पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग इतर शेतकऱ्यांसाठी करावा त्यातून अधिक प्रगती साधता येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com