वार्तापत्र : बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत
Farmer

वार्तापत्र : बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत

नाशिक तालुका वार्तापत्र | Nashik सुधाकर गोडसे

जुलै महिन्याचा दुसरा पंधरवडा सुरू झाला तरी पावसाने दडी मारल्याने नाशिक तालुक्यातील पूर्व भागातील बळीराजा मेटाकुटीला आला आहे. यंदा जून महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या पंधरवड्यात जोरदार सलामी देणार्‍या पावसाने नंतर उघडीप दिल्याने सर्वत्र दुबार पेरणीचे संकट उभे राहत आहे.

रब्बी हंगामात पेरणी केलेल्या सोयाबीन, भुईमूग, उडीद ,मूग या कडधान्यांला पावसाची नितांत गरज असल्याने शेतकर्‍यांचे डोळे आभाळाकडे लागले आहे, खरीप हंगामातील पिकांना विहिरीतील पाण्यापेक्षा पावसाच्या पाण्याचा मोठा उपयोग होत असतो.

यंदा पीक जोमदार येणार अशी अपेक्षा बाळगणार्‍या बळीराजा पुढे पावसाने दडी मारल्यामुळे मोठे संकट उभे राहिले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व उद्योग बंद झालेले असतांना केवळ शेती हाच उद्योग सुरू राहिला. या उद्योगालाही निसर्गाची साथ लाभत नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल.

नाशिक तालुक्यातील पूर्व भागातील राहुरी, दोनवाडे, नानेगाव, संसरी, बेलतगव्हाण, शेवगेदारणा, लोहशिंगवे, वंजारवाडी, लहवित, भगूर, त्याचबरोबर पळसे, शिंदे, मोहगाव, बाबळेश्वर, तर पश्चिम पट्ट्यातील दरी मातोरी, मुंगसरा, दुगाव, गिरणारे या भागातही पेरणी केलेली पिके पावसाअभावी जळू लागली आहेत.

याशिवाय ज्या शेतकर्‍यांकडे पाण्याची व्यवस्था आहे असे शेतकरी भात लागवडीसाठी शेत तयार करीत असताना गायब झालेला पाऊस या पिकालादेखील मारक ठरत आहे.

यंदा प्रथमच टोमॅटोची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेली असताना व त्यासाठी औषधे व इतर खर्च हा देखील प्रमाणापेक्षा जास्त झालेला असताना पाण्याअभावी हे पीकही मान टाकू लागले आहेत. तसेच सोयाबीनचे बियाणे यंदा निकृष्ट दर्जाचे निघाल्याने व अनेक ठिकाणी त्याची उगवण न झाल्याने शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडला आहे. दुबार पेरणीमुळे वेळ व पैसाही वाया जाऊन पाऊस पावसाने उघडीप दिल्याने ही पेरणी वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

द्राक्ष बागायतदारांना मागील हंगामात मोठा आर्थिक फटका बसल्याने यंदा अनेकांनी आपल्या बागा तोडून नगदी पिकाकडे वळाले असतानाच या पिकांचा लागवड खर्चही वसूल होतो की नाही अशी चिंता शेतकर्‍यांना सतावू लागली आहे.

मात्र तालुक्यातील उसाचे क्षेत्र वाढले असून या पिकाला सध्यातरी कुठलाही धोका नाही. त्यामुळे भविष्यात ऊस हेच पीक तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी वरदान ठरणार आहेत. चालू आठवड्यात पावसाने दडी मारल्यास शेतकर्‍यांपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे. जिल्हा बँकेने खरीप हंगामासाठी कर्ज उपलब्ध करून दिल्यासे बळीराजाला काही प्रमाणात का होईना आधार मिळणार आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी देखील जिल्हा बँकेला साकडे घालने गरजेचे आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com