शेतकर्‍यांनी घरगुती बियाणे वापरावे : पाटील

शेतकर्‍यांनी घरगुती बियाणे वापरावे : पाटील
सोयाबीन

शिरवाडे वाकद । वार्ताहर | Shirwade Vakad - Niphad

खरीप हंगाम (kharip season) अगदी दोन आठवड्यावर येऊन ठेपला आहे. ऐन हंगामात बियाणे टंचाई (Seed scarcity) ही नित्याचीच बाब झाली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी स्वयंपूर्ण होत घरगुती सोयाबीन (Soybean) बियाण्याची उगवण क्षमता तपासून बियाणे पेरणी करावी असे आवाहन तालुका कृषी अधिकारी बी.जी. पाटील (Taluka Agriculture Officer B.G. Patil), सहाय्यक राहूल साठे यांनी केले आहे.

बियाण्याची उगवण क्षमता तपासण्यासाठी सुती पोते, चौकोनी सुती कपडा किंवा एकावर एक 5 वर्तमानपत्र असे वरील पैकी कोणतीही एक वस्तू घेऊन ती पूर्णपणे भिजवून घ्यावी. त्यानंतर ती व्यवस्थितपणे जमिनीवर अंथरावी. प्रत्येक ओळीमध्ये सुमारे 10-10 बियांचा वापर करून 10-10 च्या रांगा करून व्यवस्थितपणे बियाणे ठेवून घ्यावे. यानंतर सदर पोते, वर्तमानपत्र, सुती कापड गोलाकार गुंडाळून घ्यावे. गुंडाळताना ओल्या पोत्यातील अथवा तत्सम वस्तूवरील बिया हलणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

यानंतर गुंडाळलेल्या पोत्यास कडेला सुतळीने बांधून घ्यावे आणि तीन ते चार दिवस जेथे जास्त उजेड येणार नाही अशा ठिकाणी सावलीला ठेऊन त्यावर दिवसातून 3-4 वेळा हलकेसे पाणी शिंपडावे. तीन ते चार दिवस झाल्यानंतर उगवण झालेली एक एक रांग मोजून घ्यावी. 100 पैकी जेवढ्या बियाण्यास मोड आलेले आहेत असे सुदृढ व निरोगी बियाणे मोजून घ्यावे. 100 बियांपैकी किमान 70 सुदृढ व निरोगीर बियाने मोड आलेले असल्यास सदरील बियाणे पेरणीसाठी योग्य आहे असे समजावे.

जेवढे बियाणे उगवले असेल तेवढी टक्केवारी येते. उदा. 80 बियाणे उगवले तर 80 टक्के गृहीत धरावे. किमान 70 टक्के किंवा त्याच्या पुढे बियाणे उगवण क्षमता असेल तर सरासरी 30 किलो बियाणे एकरी वापरावे. यानंतर 70 टक्के पेक्षा जर उगवण कमी झाली असेल तर प्रत्येक 1 टक्का उगवण क्षमता घटसाठी अर्धा किलो जास्तीचे बियाणे वापरावे. समजा 69 टक्के उगवण झाली तर 30.5 किलो, 68 टक्के झाली तर 31 किलो बियाणे वापरावे.

उगवण क्षमता 70 टक्के - 30 किलो, 69 टक्के - 30.50 किलो, 68 टक्के, 31 किलो, 67 टक्के - 31.50 किलो, 66 टक्के - 32 किलो, 65 टक्के - 32.50 किलो, 64 टक्के - 33 किलो, 63 टक्के - 33.50 किलो, 62 टक्के - 34 किलो, 61 टक्के - 34.50 किलो, 60 टक्के - 35 किलो याप्रमाणे बियाणे पेरणी करावी. 60 टक्क्यापेक्षा कमी उगवणीचे बियाणे वापरू नये असे आवाहन निफाडचे तालुका कृषी अधिकारी ब.टू. पाटील यांनी शेतकर्‍यांना केले आहे.

Related Stories

No stories found.