टप्याटप्याने कांदा विक्री शेतकरी हिताची

नाफेड संचालक अशोक ठाकूर यांचा सल्ला
टप्याटप्याने कांदा विक्री शेतकरी हिताची

लासलगाव | वार्ताहर | Lasalgaon

केंद्राने (Central Government) लागू केलेले कृषी कायदे हे शेतकरी हिताचे असून शेतकर्‍यांनी कांद्याची विक्री (Onion sales) टप्प्या-टप्प्याने करावी, त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही...

संपूर्ण भारतात 4200 कृषी उत्पन्न बाजार समित्यांची आवश्यकता असताना प्रत्यक्षात 7501 बाजार समित्या कार्यरत आहेत. अनेक वेळा कांद्याची शेती तोट्याची जाते. कधी भाव पडतात तर जेव्हा भाव वाढतो तेव्हा शेतकर्‍यांकडे (Farmers) कांदा नसतो, असे प्रतिपादन नाफेडचे नवी दिल्ली येथील संचालक अशोक ठाकूर (Ashok Thakur) यांनी केले.

लासलगाव येथे कृषी उद्योजकता संवाद व बाजार समिती पदाधिकारी भेट, शेतकरी चर्चा या कार्यक्रमात ठाकूर बोलत होते.

ते म्हणाले की, 2014 साली केंद्रात मोदी सरकार सत्तेत येण्यापूर्वी नाफेड ही संस्था डबघाईला आली होती. नाफेडच्या मालमत्तादेखील विक्रीस निघाल्या होत्या. नाफेडवर 2700 करोड रुपये कर्ज झाले होते.

मात्र मोदी सरकारने नाफेडला ऊर्जितावस्थेत आणले. केंद्र शासनाचे कृषी कायदे हे शेतकरी हिताचे असल्याने राज्य सरकारने ते जसेच्या तसे लागू करणे गरजेचे आहे. केंद्राच्या कायद्यामुळे 90 दिवसांत शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळणे शक्य होणार आहे.

लासलगाव ही कांद्याची प्रमुख बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकर्‍यांनी कांदा साठवणुकीला प्रथम प्राधान्य द्यावे, असेही ठाकूर म्हणाले.

यावेळी माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे (Anil Bonde) म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या शेतकरी कायद्यानुसार व्यापारी, करार करणार्‍या कंपन्यांविरोधात शेतकर्‍यांना उपजिल्हाधिकार्‍यांकडे दाद मागता येते.

शेतकर्‍यांनी कृषी कायद्याला विरोध करण्याअगोदर यातील तरतुदी अभ्यासाव्यात. तेव्हा त्यांच्याही लक्षात येईल की, हे कायदे त्यांच्या हिताचे आहेत. शेतकर्‍यांना माल विक्रीचे पर्याय यामुळे उपलब्ध होणार असल्याचे बोंडे म्हणाले.

यावेळी सुवर्णा जगताप (Suvarna Jagtap) म्हणाल्या, करोना (Corona) प्रादुर्भावामुळे बाजार समितीत शेतमाल लिलाव बंद होते. मात्र आता ते सुरू झाल्याने शेतकर्‍यांसह हमाल, माथाडी व बाजार समितीवर अवलंबून असणार्‍या घटकांच्या समस्या कमी होण्यास मदत झाली आहे. बाजार समितीने नेहमी शेतकरी हिताला प्राधान्य दिल्याचे जगताप म्हणाल्या.

याप्रसंगी भाजपचे जिल्हा संघटन सचिव सुनील बच्छाव, किसान मोर्चा अध्यक्ष बापू पाटील, मंडल अध्यक्ष स्मिता कुलकर्णी, ज्योती शिंदे, रूपा केदारे, भारती महाले, शैलजा भावसार, बाजार समिती सचिव नरेंद्र वाढवणे, उपसचिव सुनील डचके, राजेंद्र चाफेकर, संतोष पलोड, कैलास सोनवणे, महेंद्र राणा, नीलेश सालकाडे, विकी रायते आदी उपस्थित होते. राजेंद्र चाफेकर यांनी सूत्रसंचालन केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com