कांदा बियाणांसाठी शेतकर्‍यांची शोधमोहिम

कांदा उत्पादक शेतकरी
कांदा उत्पादक शेतकरी

निफाड। प्रतिनिधी

यावर्षी अतिपावसामुळे लाल कांद्यासह पोळ कांद्याचे बियाणे वाया गेले .

आता शेतकरी उन्हाळ कांदा बियाणाच्या शोधात असून अवघ्या महिनाभराच्या अंतराने उन्हाळ कांदा बियाणे प्रतिकिलो मागे 1 ते 3 हजार रुपयांनी वाढले असून कृषी विक्रेत्यांकडे उन्हाळ कांदा बियाणे 3200 ते 5000 रुपये किलोप्रमाणे विक्री होवू लागले आहेत.

यावर्षी करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे द्राक्षहंगाम वाया गेला असून त्यानंतर सततच्या पावसामुळे शेतकर्‍यांनी लाल कांद्याचे टाकलेले बियाणे उतरलेच नाही. तर जे बियाणे उतरले ते अतिपावसामुळे वाया गेले. पोळ कांदा रोपांची तिच अवस्था झाली.

महागडे बियाणे घेऊनही ते वाया गेल्याने शेतकरी आता उन्हाळ कांदा लागवडीच्या विचारात असून घरगूती बियाणांचा शोध घेतला जात आहे. मागील महिन्यात कृषी विक्रेत्यांकडे उन्हाळ कांदा बियाणे 2000 ते 2200 रू. किलोप्रमाणे विक्री होत होते.

मात्र आता हेच बियाणे 3200 ते 5000 रु. प्रती किलोप्रमाणे विकले जात आहे. अद्यापही तालुक्यात पावसाची हजेरी सुरुच असल्याने लाल कांद्याप्रमाणे उन्हाळ कांदा बियाणे वाया जावू नये यासाठी शेतकरी उशिरा कांदा बियाणे टाकण्याची शक्यता आहे.

साहजिकच कांदा रोप तयार होण्यासाठी दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने डिसेंबर महिन्यात उन्हाळ कांदा लागवडीस प्रारंभ होऊन हा कांदा एप्रिल ते मे महिन्यात काढणीस येईल. मात्र डिसेंबर ते जानेवारी महिन्यात होणारी गारपीट तसेच अति थंडी यामुळे कांंदा पिक वाचविण्याची शेतकर्‍यांना कसरत करावी लागणार आहे.

साहजिक महागडे कांदा बियाणे घेण्याबरोबरच कांदा लागवड, खते, औषधे, कांदा काढणी यावर मोठा खर्च करावा लागणार असून वाढत्या विजभारनियमनात रात्रीचा दिवस करुन शेतीला पाणी द्यावे लागणार आहे. यावर्षी शेतकर्‍यांची सारी भिस्त उन्हाळ कांदा पिकावरच असून उन्हाळ कांदा बियाणांचे भाव मात्र मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

यावर्षी सर्वत्र पावसाने हजेरी लावल्याने पाणीटंचाई भासणार नाही ही बाब हेरुन दरवर्षी लाल कांदा पिकविणारे नांदगाव, सिन्नर, येवला, चांदवड, मालेगाव, कळवण, सटाणा, देवळा आदी तालुक्यातील शेतकरी यावर्षी उन्हाळ कांदा पिकाकडे वळण्याची शक्यता अधिक असून यावर्षी उन्हाळ कांद्याचे विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे आज कांद्याला मिळणारा बाजारभाव पुढे राहिलच याची खात्री नाही. मात्र शेतकरी हा आशावादी असल्याने शेतमाल पिकविणे हेच उद्दीष्ठ डोळ्यासमोर ठेऊन तो कांदा लागवड अधिक कशी होईल यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. यावर्षी कांदा लागवड मजूरीत देखील वाढ झाली असून ग्रामीण भागात टेंडर पद्धतीने कांदा लागवडीला महत्व दिले जात आहे.

त्यासाठी एकरी 8 ते 10 हजार रुपये मजूरी द्यावी लागत असून तेवढीच मजूरी कांदा काढणीसाठी मोजावी लागत आहे. याव्यतिरिक्त निंदणी, खते, औषध फवारणी यासाठी मोठा खर्च करावा लागत आहे.

असे असतांनाही सद्यस्थितीत असणारा बाजारभाव पुढे मिळेलच याची खात्री नाही. मात्र उन्हाळ कांदा हा साठवून ठेवता येत असल्याने व गरज पडेल तेव्हा विक्री करता येत असल्याने तालुक्यातील शेतकरी उन्हाळ कांदा लागवडीला सर्वाधिक पसंती देत आल्याने तालुक्यात दरवर्षी उन्हाळ कांद्याचे विक्रमी उत्पादन होत असते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com