
अलियाबाद । जिभाऊ भामरे
मोसम खोर्यास वरदान ठरलेले हरणबारी धरण अखेर काल रात्री शंभर टक्के भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागल्याने जीवनदायीनी मोसम नदी प्रवाहित झाली आहे. गतवर्षापेक्षा तब्बल एक महिना उशीरा का होईना, हरणबारी ओसंडून वाहू लागल्याने ग्रामस्थांसह शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
बागलाण तालुक्यासह मोसमखोर्यात यंदा वरुणराजाची कृपा असल्याने खरीप हंगाम चांगलाच बहरला आहे. मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीन आदी पिके यंदा जोमात आहे. मक्यावर लष्करी अळीने आक्रमण केले असले तरी सातत्याने किटकनाशकांची फवारणी करत या अळीवर नियंत्रणाचा प्रयत्न शेतकर्यांतर्फे केला जात आहे.
हरणबारी पाणलोट क्षेत्रात देखील उघडकीप घेत पर्जन्यवृष्टी होत असल्याने हरणबारीच्या जलाशयात टप्प्याटप्प्याने वाढ होत होती. काल सकाळी 94 टक्के साठा झाला होता. मात्र रात्रीतून 1166 द. ल. घ. फूट पाणीसाठा होऊन धरण शंभर टक्के भरले जाऊन सांडव्यावरून पाणी मोसमनदी पात्रात पडले. 846 क्युसेस पाणी सांडव्यावरून मोसम नदीपात्रात वाहत होते. त्यामुळे मोसम नदी पुन्हा प्रवाहित झाली आहे.
हरणबारी धरणावर मोसमखोर्यातील अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. मोसमला पूर आल्यास या पाणीपुरवठा योजनांच्या विहिरींना पाणी उतरण्यास तसेच नदीपात्रात असलेले केटीवेअर बंधारे भरण्यास मदत होऊन पिण्याचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होते. सिंचनास देखील या पुराचा लाभ होत असल्याने संपूर्ण मोसमखोर्याचे लक्ष हरणबारी तुडुंब केव्हा भरते, याकडे लागले होते. रात्रीतून धरण ओव्हरफ्लो होऊन वाहू लागल्याने ग्रामस्थांसह शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.