
पिंगळवाडे | Pingalwade
पिंगळवाडे (Pingalwade) येथे करंजाड ते मुंगसे रस्ता लगत लांगी शिवारात साधारण वीस ते पंचवीस शेतकरी वास्तव्यास आहेत. या शेतकऱ्यांना करंजाडी नदी पात्रातून प्रवास करावा लागत आहे. जर नदीपात्रास पाण्याचे प्रमाण जास्त राहिले तर या शेतकऱ्यांना (Farmers) मुख्य रस्त्याचा संपर्क कायम तुटत असतो.
तसेच नदीपात्रातील पाणी (Water) कमी होईपर्यंत शाळकरी मुलांना घरीच थांबावे लागते. शेतकऱ्यांना आपला शेतमाल मुख्य रस्त्याला आणणे अवघड होत आहे. या गैरसोयीमुळे परिसरातील शेतकऱ्यांना नदीपात्राच्या पाण्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिक शेतकऱ्यांनी वेळोवेळी लोकप्रतिनिधी व शासकीय पातळीवर याबाबत माहिती दिली आहे. परंतु याकडे कोणी गांभीर्याने लक्ष देण्यास तयार नाही. पुलासाठी काही प्रमाणात निधी मंजूर झाला आहे. परंतु हा निधी (Fund) पुलाच्या कामासाठी अपुरा पडत असल्याने पुलाचे काम पूर्ण होऊ शकले नाही.
स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार जर करंजाडी नदीला पूर परिस्थिती निर्माण झालीच तर आम्हाला रात्री अपरात्री मुख्य रस्त्याला येणे फार गैरसोयीचे होत आहे. याबाबत शासनाने (Government) गांभीर्याने विचार करावा आणि तत्काळ पुलासाठी निधी द्यावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
साधारण वीस ते पंचवीस वर्षापासूनची आमची मागणी ती आजही प्रलंबित आहे. आमची मागणी लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी.
- गिरीश भामरे, स्थानिक शेतकरी.