उन्हाळ कांदा लागवडीत शेतकरी व्यस्त

उन्हाळ कांदा लागवडीत शेतकरी व्यस्त

अंबासन | प्रशांत भामरे | Ambasan

अंबासनसह मोसम खोर्‍यात उन्हाळी कांद्याचा (Summer onions) हंगाम घेण्याची लगबग सुरू झाली असून कांद्याचे रोपे टाकण्याचे काम शेतकर्‍यांतर्फे (Farmers) जोरात सुरू झाले आहे. पूर्वीच बियाणांची पेरणी (Sowing) केलेल्या कांद्याचे उळे अनेक शेतात डौलत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नोव्हेंबरअखेर अथवा डिसेंबर महिन्यात कांद्याची लागवड करावी लागणार असल्याने खरिपाची आवरासावर शेतकर्‍यांतर्फे केली जात आहे....

खरीप हंगामाला यंदा अतिवृष्टीने (Heavy Rain) तडाखा दिल्याने हातात आलेली पिके वाया गेल्याने शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. या संकटातून सावरण्यासाठी नगदी व हक्काचे पीक असलेल्या उन्हाळी कांदा लागवडीकडे यंदा मोठ्या प्रमाणात शेतकरी आकृष्ट झाले आहेत. उन्हाळ कांद्यास मिळत असलेला चांगला भाव हे कारणदेखील क्षेत्र वाढण्यास कारणीभूत ठरत असल्याचे सांगितले जाते.

नाशिकसह (Nashik) देशात उन्हाळ कांद्यास चांगली मागणी असल्याने भावदेखील समाधानकारक मिळत आहे. अतिवृष्टीने पावसाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. त्यामुळे आगामी काळात कांद्यास चांगलाच भाव राहणार असल्याचे गणित दिसून येत असल्याने यंदा उन्हाळी कांदा लागवडीस मोसम खोर्‍यातील शेतकर्‍यांनी पसंती दिली आहे.

नोव्हेंबरअखेर अथवा डिसेंबर महिन्यात कांद्याची लागण करावी लागत असल्याने शेतकर्‍यांनी खरीप पिकांची आवरसावर करून रोपे टाकंण्यांची लगबग सुरू झाली आहे. नवरात्राच्या प्रारंभी रोपे टाकावी लागतात व नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये त्यांची लागवड करावी लागते. त्यामुळे बियाणे पेरण्याची लगबग सुरू झाली आहे. काही शेतकर्‍यांनी अगोदरच बियाणांची पेरणी केली असल्याने त्यांच्या शेतात हिरवीगार उळे डौलत असल्याचे दिलासादायक चित्र दृष्टीस पडत आहे.

बियाणे निकृष्ट निघण्याचे प्रकार सध्या वाढले आहेत. त्यामुळे घरातीलच बियाणे पेरण्याकडे शेतकर्‍यांचा कल अधिक आहे. उत्पन्नवाढीसाठी प्रक्रिया केलेल्या कंपन्यांच्या बियाणांनासुद्धा पसंती दिली जात आहे. मात्र पूर्वानुभव ज्या बियाणांचा चांगला असेल त्यालाच उत्पादक पसंती देत आहेत.

कांदा लागवडीचे क्षेत्र दिवसागणिक वाढत असल्याने अनेक कंपन्या कांदा बियाणांची निर्मिती करत आहेत. मात्र फसगतीचे प्रमाणदेखील वाढले आहे. काही ठिकाणी पावसाळी बियाणे निघण्याचे तर काहींचे ढोले फुटले जातात. बियाणे निकृष्ट निघाल्यास पूर्ण हंगामच वाया जातो. त्यामुळे बियाणे टाकताना कमालीची दक्षता कांदा उत्पादकांतर्फे घेतली जात आहे.

दुष्काळ हा शेतकर्‍यांच्या पाचवीलाच पुजलेला आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ. मात्र दोन्ही दुष्काळांचा समर्थपणे सामना करत बळीराजा पुन्हा नवीन हंगाम घेण्यासाठी नव्या ताकदीने उभा राहतो. यावर्षी अतिवृष्टीने खरीप हंगामाला तडाखा दिला असला तरी रब्बी हंगामासह उन्हाळ कांद्याच्या लागवडीसाठी शेतकरी पुन्हा नव्या जोमाने सज्ज होत आहे.

मका, बाजरीचा सीझन मजूर टंचाई असतानासुद्धा घरातील लहान-मोठे एकदिलाने व आनंदाने हाती आलेले पीक आवरण्यात व्यस्त आहेत. तसेच वेळेवर कांद्याची बियाणेसुद्धा टाकली जात आहेत. बियाणांची टंचाई असतानासुद्धा काही घरचे होते ते तर बाजारातून 10 ते 12 हजार रुपये पायलीप्रमाणे बियाणे खरेदी करून कांद्याची रोपे तयार करण्याची शेतकर्‍यांची लगबग सुरू झाली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com