कांदा दरात घसरण
नाशिक

कांदा दरात घसरण

उत्पादकांमध्ये निराशा

Abhay Puntambekar

मनमाड । प्रतिनिधी Manmad

चार दिवसाच्या सुटीनंतर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव सुरु झाले मात्र पहिल्याच दिवशी कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली. कांद्याला प्रती क्विंटल कमीतकमी २०० रुपये जास्तीतजास्त ६९७ तर सरासरी ५५० रुपये भाव मिळाल्याने उत्पादकांमध्ये निराशेचे सावट पसरले.

दरम्यान, सरासरी ५५० रुपये भाव मिळाल्याने लिलावासाठी बाजार समितीत कांद्या आणण्यासाठी वाहतुकीला लागणारा खर्च देखील वसूल होत नसल्याचे पाहून उत्पादक अक्षरश: हवालदिल झाले होते. लासलगाव बाजार समिती पेक्षा मनमाडला भावात क्विंटल मागे १५० ते २५४ रुपये फरक असल्याचे पाहून शेतकर्‍यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. बाजार समिती प्रशासन-संचालक मंडळाने या दराच्या तफावतीबाबत त्वरीत लक्ष घालावे, अशी मागणी उत्पादकांनी केली.

मनमाड परिसरासह नांदगाव, चांदवड, येवला, मालेगाव आदी तालुक्यातील शेतकर्‍यांनी बाजार समितीत २०० वाहनातून तब्बल ६ हजार क्विंटल कांदा विक्रीसाठी आणला होता. चांगला भाव मिळेल या आशेवर आम्ही आलो मात्र पदरी ५५० रूपये भाव पडला. वाहनाचा खर्च देखील यातून निघणार नसल्याची खंत शेतकर्‍यांनी बोलून दाखवली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com