
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
मागील काही महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या (Farmers) कांद्याला (Onions) बाजार समितीत व नाफेडकडून (Nafed) उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान होत आहे. कांद्याचे दर प्रचंड घसरल्याने राज्यात काही ठिकाणी शेतकऱ्यांनी आत्महत्या (Suicide) केलेल्या आहेत. तसेच काही शेतकऱ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. कांदा दर घसरणीमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची भावना असताना देशातील व राज्यातील राजकीय नेत्यांचे मात्र यावर दुर्लक्ष आहे...
या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांचे (Political leaders) लक्ष वेधून घेण्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी राजकीय नेत्यांच्या सोशल मीडियावरील (Social Media) व्हिडिओज आणि पोस्टच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये (Comments box) जाऊन शेतकऱ्यांच्या कांद्याला तात्काळ 30 रुपये प्रति किलोचा भाव द्यावा, अशी मागणी करावी.
ही मागणी करताना मराठी, हिंदी, इंग्रजी अशा भाषेत कमेंट्स कराव्यात, अशी विनंती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे (Bharat Dighole) यांनी केली आहे.
आमदार, खासदार, मंत्री, केंद्रीय मंत्री, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री, पंतप्रधान, या सर्वांच्याच सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून करण्यात येणाऱ्या पोस्टमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याच्या घसरलेल्या बाजार भावात तात्काळ सुधारणा व्हावी व कांद्याला कमीत कमी 30 रुपये किलोचा दर मिळावा व कांद्याची जास्तीत जास्त निर्यात करावी. यासाठी हजारो कमेंट्सच्या माध्यमातून आवाज उठवावा. शेतकऱ्यांनी केलेल्या कमेंट्सचे स्क्रीनशॉट काढून सोशल मिडीयात शेअर करावेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
कांद्याचे दर वाढण्यासाठी रास्ता रोको, मोर्चे यासारखे आंदोलने तर सुरूच राहतील. परंतु, आता महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली राजकीय नेत्यांच्या सोशल मीडियाच्या पोस्टला शेतकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडून संबंधित नेत्यांचे कांदा प्रश्नाकडे लक्ष वेधून घ्यावे. जास्तीत जास्त कांदा उत्पादकांनी या आंदोलनात सहभाग घेतल्यास कांदा दरवाढीसाठी शेतकऱ्यांनी केलेले आगळेवेगळे सोशल मीडियावरील कमेंट्स आंदोलनही मोठे प्रभावी ठरेल.
- भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना.