
घोटी | जाकीर शेख | Ghoti
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील जायकवाडी धरण आणि नाशिक मनपा क्षेत्रात इगतपुरी तालुक्यातील मुकणे धरणातील (Mukne Dam) पाणी सोडले जाते. यासाठी अस्वली, नांदगाव बुद्रुक, जानोरी, पाडळी या गावांतून जाणाऱ्या ओंडओहोळ नदीचा ( River) वापर केला जातो. मात्र, या पाण्यामध्ये गोंदे, वाडीव-हे भागातील कंपन्यांचे घातक केमिकल टाकले जात असल्याचा संशय या भागातील नागरिकांना अनेक वर्षांपासून होता...
आज गुरुवार (दि.१८) रोजी पहाटेच्या सुमारास अस्वली-नांदगाव बुद्रुकला जोडणाऱ्या पुलावर घातक केमिकल (chemical )पाण्यात ओतणारा टँकर नागरिकांनी पकडला. यावेळी टँकर चालकाने नागरिकांचा (Citizens) रोष पाहून वाहन सोडून पलायन केले. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणारी ही घटना असून शेतकऱ्यांच्या जमिनी नापिक करण्याला देखील हे केमिकल कारणीभूत आहे.
या केमिकलच्या दुष्परिणामामुळे कर्करोग, वंद्यत्व, लैंगिक समस्या, बौद्धिक दुर्बलता निर्माण होतांना दिसतात. तसेच केमिकलच्या पाण्यामुळे (Chemical Water) विहिरी, हातपंप दूषित होऊन नागरिकांना मरणपंथाला लावत आहेत. मात्र यावेळी टँकर चालक केमिकल नदी पात्रात टाकत असताना नागरिकांनी हा डाव उधळून लावत संबंधित कंपनीवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, गेल्या १५ ते २० वर्षांपासून इगतपुरी तालुक्यातील नद्यांमध्ये घातक केमिकल ओतले जाते आहे. पूर्वी मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai-Agra Highway) पाडळी देशमुख जवळील पुलावर केमिकल टाकले जात होते. येथील परिसरातील नागरिक जागरूक झाल्याने तिथे टाकणे बंद करून अस्वलीजवळ ओंडओहोळ नदीच्या पुलावर केमिकल टाकायला सुरुवात झाली. याही ठिकाणी लोकांना माहिती झाल्याने संबधित कंपन्या सावध झाल्या. त्यानंतर आता नांदगाव बुद्रकजवळ असणाऱ्या नदी पात्राच्या पुलावरून केमिकल टाकले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नाशिकचे प्रदूषण नियंत्रण मंडळ करतंय तरी काय? असा सवाल शेतकरी विचारत आहेत.