
नाशिक | Nashik
राज्यात कांद्याला (Onion) अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे, विरोधी पक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी (Farmers) संघटना तसेच अन्य संघटनांनी पिकाला योग्य ते अनुदान आणि हमीभाव मिळावा यासाठी आंदोलन केले होते.
कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव तर, पंधराशे रुपये अनुदान मिळावे ही मागणी करण्यात आली होती. मात्र, उत्पादनखर्च 2000 ते 2200 रुपये प्रति क्विंटल इतका येत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात कांद्याला प्रतिक्विंटल 300 रुपये सानुग्रह अनुदान देणार असल्याचे जाहीर केले आहे.
त्यामुळे राज्य सरकारने तीनशे रुपये प्रतिक्विंटल हे अतिशय तुटपुंजे अनुदान दिले असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. सरकारने अनुदानाची रक्कम वाढवून द्यावी आणि कांद्याला प्रति क्विंटल तीन हजार रुपये हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे.