बाजार समितीत मारहाण झाल्याने शेतकरी संतप्त

 बाजार समितीत मारहाण झाल्याने शेतकरी संतप्त

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि.३) घडली. या प्रकाराची कैफियत मांडण्यासाठी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात धाव घेतली.मात्र,त्याचावेळी समितीची सभा सुरु असल्याने शेतकऱ्यांना दोन तास बाहेर ताटकळत उभे रहावे लागले.यामुळे शेतकरी चांगलेच संतापले.

बाजार समितीमध्ये शेतकऱ्याना सापत्न वागणुक मिळत असल्याने बाजार समितीत नेमकी कुणाची मक्तेदारी सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित करत शेतकर्यांनी हा प्रकार घडल्यानंतर संचालक मंडळाचाबद्दलही निषेध व्यक्त केला.

सकाळी अकरा वाजता मातोरी येथील शेतकरी ओंकार पिंगळे हे आपली शिमला मिरची घेऊन दिंडोरी रोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आले होते. मात्र, बाजार समितीमध्ये नशेत असलेल्या सात ते आठ जणांच्या टवाळखोरांनी पिंगळे यांना बेदम मारहाण करत त्यांच्या अंगावरील कपडे फाडले. त्यांना सोडविण्यासाठी गेलेल्या काही शेतकऱ्यांना देखील या टवाळखोरांनी मारहाण केल्याची घटना घडली.

बाजार समितीच्या सुरक्षारक्षकांनी धाव घेत यातील एका संशयिताला पकडले.घडलेल्या या प्रकारामुळे बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शेतकऱ्याला मारहाण झाल्याने शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला.

संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात धाव घेत सभापती देविदास पिंगळे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षा रक्षकांनी सभा सुरू असल्याचे कारण देत सभागृहाचे दरवाजे बंद करून घेतले.यावेळी सभापती भेटत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बंद दरवाज्यावर जोरजोरात हात मारून दरवाजा उघडण्यास भाग पाडत सभापतींनी बाहेर येण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, सभापती पिंगळे शेतकऱ्यांना भेटण्यास बाहेर आले नाही.

यावेळी संचालक जगदीश अपसुंदे यांनी सभागृहाबाहेर येत पीडित शेतकऱ्याची भेट घेत त्यांना सभागृहात घेऊन गेले. मात्र, या दरम्यान माध्यम प्रतिनिधींना सभागृहात येण्यास मज्जाव करण्यात आल्याने शेतकऱ्यांना काय आश्वासन दिले याबाबत माहिती मिळू शकली नाही.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com