'या' कारणास्तव शेतकऱ्यांचे कुटुंबासह आंदोलन

आंदोलनाचा 8 वा दिवस
'या' कारणास्तव शेतकऱ्यांचे कुटुंबासह आंदोलन

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

तालुक्यातील बोरी-आंबेदरी धरणाच्या ( Bori- Aambedari Dam ) कालव्याऐवजी जलवाहिनी टाकून त्याव्दारे पाणीपुरवठा करण्याची योजना त्वरीत रद्द करावी या मागणीसाठी दहिदीसह वनपट, टिंगरी व राजमाने येथील शेतकर्‍यांसह महिला, मुले व ज्येष्ठ नागरिक व शेतमजुरांचे बेमुदत धरणे आंदोलन काल आठव्या दिवशी देखील सुरूच होते.

लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांनी आमची रास्त मागणी मंजूर करावी. कालव्यात जलवाहिनी टाकल्यास शेती पूर्णत: उद्ध्वस्त होऊन आमचे कुटुंब उघड्यावर पडणार आहे. त्यामुळे या योजनेस आमचा विरोध आहे. जलवाहिनी टाकण्याचा अट्टाहास ठेवल्यास यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन आम्हाला हाती घ्यावे लागेल. वेळ पडल्यास जलवाहिनी फोडण्यास देखील आम्ही मागे हटणार नाही, असा इशारा संतप्त आंदोलनकर्त्या शेतकरी महिलांनी यावेळी बोलतांना दिला.

दरम्यान, मालेगावकर विधायक संघर्ष समितीचे प्रमुख निखील पवार यांनी पालकमंत्री दादा भुसे यांनी आपला महत्त्वाकांक्षी बंद पाईप लाईन कालवा प्रकल्प रद्द करून त्या निधीतून बोरी आंबेदारी धरणाचा जलाशय मोठा करत पाट कॅनल दुरुस्ती व लाभ क्षेत्रात वाढ करावी, जनभावना लक्षात घेऊन आंदोलकांच्या मागणीची दखल घ्यावी असे आवाहन केले आहे.

बोरी-आंबेदरी व दहिखुटे धरण लाभ क्षेत्रात बंद पाईप लाईन कॅनल द्वारे पाणी पुरवठा करण्याच्या योजनेस 17 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. राज्यात प्रथमच अशी योजना राबवली जात असून योजना चांगली असली तरी माळमाथ्याची भौगोलिक परिस्थिती बघता किती व्यवहार्य ठरेल यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याकडे संघर्ष समितीने लक्ष वेधले आहे.

येथील जमीन अतिशय मुरमाड असून शेतीला रोज पाणी दिले तरी देखील ते कमी पडते, याभागात अल्प भूधारक शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहे, ते पारंपरिक शेती करतात, अतिशय कमी प्रमाणात शेततळे व पाणी साठवण व्यवस्था नसलेला हा भाग आहे. पाट कॅनलद्वारे पाणीपुरवठा होतो तेव्हा जमिनीत काही प्रमाणात पाणी मुरून जमितील भूजल पातळी वाढते त्याचा अप्रत्यक्ष फायदा शेतीला होतो. बंद पाईप द्वारे पाणीपुरवठा झाल्यास भूजल पातळी कमी होईल त्यामुळे उन्हाळ्यात या भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करेल.

तालुक्यात शेतकर्‍याकडे वीज बिल भरायला पैसे नसतात ते पाणी पट्टी कशी भरणार? पाणी पट्टी भरली नाही म्हणून पाणीपुरवठा बंद केल्यास पीक नुकसान होईल त्याची भरपाई कशी करणार? भूजल पातळी कमी झाल्यामुळे जनावरे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल तो कसा सोडवणार? पाईप लाईन दुरुस्ती ही अतिशय खर्चिक बाब ठरणार आहे. या भागात शेती व शेतीपूरक उद्योग हेच रोजगाराचे प्रमुख साधन असून शेतकरी शेती शिवाय जगूच शकत नाही आणि शेती पाण्या वाचून होऊ शकत नाही त्यामुळे येथील शेतकरी बंद कॅनल पाईप लाईन कालवा प्रकल्प रद्द करावा ही मागणी करत आहे.

बोरी-आंबेदरी धरणाची उंची वाढवून गाळ काढून धरणाची पाणी साठवण क्षमता तीन ते चार पट करणे शक्य आहे. हे धरण वन हद्दीत असल्याने कोण्ही विस्थापित होणाचा प्रश्न नाही तसेच नैसर्गिकरित्या या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस दरवर्षी पडतो, त्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरले जाईल. उपलब्ध पाणी लाभ क्षेत्रातील शेतीला देऊन उर्वरित पाणी वाढीव पाट कॅनल निर्माण करत माळमाथ्याच्या इतर दुष्काळी भागात देता येईल. त्यामुळे शेतकर्‍यांच्या मागणीची दखल घ्यावी, असे आवाहन संघर्ष समितीतर्फे करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com