बाजार समित्या बंदचा फटका शेतकर्‍यांनाच

बाजार समित्या बंदचा फटका शेतकर्‍यांनाच

निफाड । Niphad (प्रतिनिधी)

कांद्याची दरवाढ रोखण्यासाठी केंद्र शासनाने कांदा आयात करून व्यापार्‍यांना कांदा साठवणूकीसाठी 31 डिसेंबरपर्यंत निर्बंध घालत व्यापार्‍यांवर धाडी टाकल्याने सोमवारपासून कांदा लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय व्यापारी वर्गाने घेतल्याने जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील कांदा लिलाव बेमुदत बंद पडले आहेत.

आजच्या परिस्थितीत शेतकर्‍यांना रब्बीची पीके उभी करण्याबरोबरच दिवाळी, दसरा सणांसाठी पैशांची गरज असतांनाच याच वेळी कांदा लिलाव बंद झाल्याने बाजार समित्या बंद चा सर्वाधिक फटका हा शेतकर्‍यांनाच बसू लागला आहे.

कांद्याचे आगार म्हणून नाशिकची ओळख आहे. त्यातही सर्वाधिक कांदा हा निफाड तालुक्यात पिकवला जातो. जिल्ह्यातील पिंपळगाव बाजार समितीत सर्वाधिक कांदा विक्रीसाठी येतो. त्याखालोखाल लासलगाव व उमराणा बाजार समितीचा नंबर लागतो.

एकट्या निफाड तालुक्यात पिंपळगाव, सायखेडा, लासलगाव, विंचूर, निफाड येथे कांद्याचे लिलाव होतात. आजच्या परिस्थितीत शेतकर्‍यांकडे अत्यल्प कांदा शिल्लक आहे. कांद्याची वाढती मागणी व अपुरा पुरवठा यामुळे कांद्याचे भाव वाढले आहेत.

कांद्याचे हे भाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र शासनाने कांदा आयात केला असून कांद्याचे हे कंटेनर मुंबईच्या जेएनपीटी बंदरात पडून आहेत. तर कांदा आयात झाल्याने लागलीच कांद्याचे भाव 2 हजार रुपयांनी घसरले आहेत. मात्र त्यानंतर पुन्हा बाजारभावात सुधारणा होत असल्याचे दिसताच केंद्र शासनाने कांदा साठवणुकीवर निर्बंध घालत व्यापार्‍यांवर धाडसत्र आरंभले आहे.

एकतर व्यापारी दिवसभर बाजार समितीत कांद्याची खरेदी करीत असतो व खरेदी केलेल्या कांद्याचे ट्रॅक्टर व्यापार्‍यांच्या खळ्यात खाली होण्यासाठी रात्रीचे 8 ते 10 वाजतात. त्यानंतर या खळ्यावर कांद्याची प्रतवारी करून तो गोणीत पॅक करावा लागतो व त्यानंतर ट्रक लोड करावा लागतो. या कामासाठी किमान दोन दिवसांचा अवधी लागतो.

मात्र याचा विचार न करता शासन व्यापार्‍यांवर स्टॉकच्या नावाखाली धाडी टाकत असल्याने व्यापारी वर्गाने कांदा लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. एकट्या पिंपळगाव बाजार समितीत दररोज 700 ते 800 वाहनांमधून कांदा विक्रीसाठी येतो.

तर लासलगावला देखील 500 ते 700 वाहने दररोज कांदा घेऊन येतात. सायखेडा येथेही किमान 200 वाहनांचे लिलाव होतात. उमराणा येथे 600 ते 800 तर विंचूरला 300 ते 400 आणि निफाडला 150 ते 200 वाहनांमधून कांदा विक्रीसाठी येत होता.

शनिवारी सकाळच्या सत्रात पिंपळगावला कांद्याला 7451 रु., सायखेड्यात 5482 रु., लासलगावला 5500 रु. तर निफाड, विंचूरलाही सरासरी 5 हजार रु. प्रमाणे कांदा विकला गेला. मात्र सोमवारपासून या बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद पडले आहेत.

कांदा लिलाव सुरू होते तेव्हा या उपबाजार आवार असलेल्या शहरातील आर्थिक उलाढाल देखील मोठ्या प्रमाणात होत असे. परंतू आता लिलाव बंद पडल्याने बाजारपेठा देखील सूनसान दिसू लागल्या आहे. एकूणच कांदा लिलाव बंदमुळे तालुक्याचे अर्थकारण कोलमडले आहे.

रब्बी हंगामावर परिणाम

यावर्षी अतिपावसामुळे खरिप हंगाम वाया गेला. त्यात शासनाने तुटपुंजी मदत जाहीर केली. अशावेळा शेतकर्‍यांना थोड्याफार शिल्लक असलेल्या कांद्याचा आधार होता. या कांदा विक्रीतून शेतकरी रब्बी हंगामातील पिके उभी करण्यासाठी तसेच नवीन कांदा लागवड करण्याच्या विचारात असतांनाच केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे कांदा लिलाव बंद पडल्याने शेतकर्‍याचे नियोजन कोलमडून पडले असून त्याचा थेट परिणाम रब्बी हंगामावर होण्याची शक्यता आहे.

मजुरांवर उपासमारीची वेळ

कांदा पिकावर शेकडो मजुरांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. लिलाववेळी कांदा खळ्यावर व रात्री ट्रक लोड करण्यासाठी हजारो मजूर रात्रंदिवस व्यापार्‍याचे खळ्यावर राबत असतात. तसेच कांदा पॅक करण्यासाठी लागणारी गोणी, शिवणारे कारागीर यांच्याही उदरनिर्वाहाचे साधन बंद झाले आहे. तसेच बाजार समिती परिसरातील उद्योगधंदे बंद पडले आहेत. वाहनचालकांचा रोजगार बुडाला आहे. वाहतुकीअभावी ट्रक उभे आहेत. एकूणच कांदा लिलाव प्रक्रिया बंद पडल्याने शेतकरी, शेतमजूर यांचे अर्थकारण कोलमडून पडले असून त्यांचेवर उपासमारीची वेळ आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com