गतवर्षाच्या तुलनेत शेतकरी आत्महत्या निम्म्याने घटल्या

दिलासादायक : टास्कफोर्सच्या प्रयत्नाना यश
शेतकरी आत्महत्या
शेतकरी आत्महत्या

नाशिक । Nashik

जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा शेतकरी आत्महत्येत निम्म्याने घट झाल्याचे दिलासादायक चित्र आहे. २०१९ मध्ये ६९ शेतकर्‍यांनी आत्महत्या करुन जीवन संपवले होते. तर यंदाच्या चालू वर्षात ३८ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या.

जिल्हा प्रशासनाने आत्महत्या रोखण्यासाठी टास्कफोर्स गठित केली असून त्यामाध्यमातून शेतकर्‍यांचे समुपदेशन केले जाते. आत्महत्येपासून शेतकर्‍यांना परावृत्त करण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना यश मिळत आहे.

मागील काही वर्षापासून शेतकरी आस्मानी व सुलतानी संकटामुळे बेजार झाला आहे. सततची नापिकी, दुष्काळ, अतिवृष्टी, शेतमालाला न मिळणारा हमीभाव हे संकटाचे दुष्चक्र सातत्याने सुरु आहे. त्यामुळे परिस्थिती समोर हतबल होउन शेतकरी आत्महत्येच्या घटनेत वाढ होत होती. जिल्ह्यात २०१८ या वर्षात १०८ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या.

तर २०१९ या वर्षात नानाविविध कारणांमुळे ६९ शेतकर्‍यांनी जीवन संपवले. देशभरातील शेतकर्‍यांचे आत्महत्येचर हे दृष्टचक्र थांबविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने पावले उचलली.केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान योजने अंतर्गत शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्षाला सहा हजार रुपये अनुदान जमा केले जाते.

तसेच बॅकांकडुन खरीप व रब्बी हंगामासाठी कर्ज पुरवठा वाढविण्यात आला. राज्य शासनाने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जिल्हाप्रशासनाला टास्कफोर्स गठित केले. त्याद्वारे शेतकर्‍यांचे समुपदेशन करुन त्यांना आत्महत्येपासून परावृत्त केले जाते.या सर्वाची परिणिती म्हणजे शेतकरी आत्महत्या रोखण्यात प्रशासनाला यश आल्याचे पहायला मिळत आहे. तसेच मागील दोन वर्षात समाधानकारक पाऊस पडला.

त्यामुळे दुष्काळाची तीव्रता जाणवली नाही. या सर्व बाबींचा सकारात्मक परिणाम म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत यंदा शेतकरी आत्महत्या निम्म्याने घटल्याचे दिलासादायक चित्र पहायला मिळत आहे. यंदा ३८ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी २२ शेतकरी आत्महत्या प्रकरणे शासकिय मदतीसाठी पात्र ठरले असून त्यांच्या परिवाराला आर्थिक मदत करण्यात आली.

तालुकानिहाय आत्महत्या (२०२०)

नाशिक - ३

बागलाण -७

चांदवड - १

सिन्नर - ३

देवळा - ०

दिंडोरी - ६

इगतपुरी - ०

कळवण - २

मालेगाव - १

नांदगाव - ०

निफाड - ११

त्र्यंबकेश्वर - ३

येवला - ०

पेठ - १

सुरगाणा - ०

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com