
अंबासन । वार्ताहर Ambasan
महड शिवारातील शेतात पिकांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या चिराई, ता. बागलाण येथील विश्वास गोविंद अहिरे या शेतकर्यावर पिकांमध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप घालून गंभीररित्या जखमी केले. कुटूंबियांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने शेतातून पळ काढल्याने त्यांचे प्राण वाचले. या घटनेने परिसरातील शेतकर्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
चिराई येथील शेतकरी विश्वास गोविंद अहिरे महड शिवारातील शेतात पिकांची पाहणी करण्यासाठी फेरफटका मारत असतानाच अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप घालून अहिरे यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविला. बिबट्याला जोरदार प्रतिकार करत आरडाओरड करून शेतातील घराकडे अहिरे यांनी धाव घेतली मात्र बिबट्याने पाठीमागून पुन्हा त्यांच्यावर हल्ला चढवत जखमी केले. मात्र मोठ्या हिमतीने अहिरे यांनी पळणे सुरूच ठेवत ते घराजवळ आरडाओरड करत पोहचले.
यावेळी कुटुंबियांनी अहिरे यांच्या पाठीमागे बिबट्या लागल्याचे पाहताच मोठमोठ्याने आरडाओरड केल्याने बिबट्याने त्यांना सोडून जंगलाकडे पळ काढला. बिबट्याच्या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या अहिरे यांना कुटुंबीयांनी तातडीने नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याने वैद्यकीय आधिकारी डॉ. संकेत पाडोळे यांनी प्राथमिक उपचार करून मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. अहिरे यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले.