तरसाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

तरसाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

मनमाड । प्रतिनिधी Manmad

शहरालगत असलेल्या बेजगाव ( Bejgaon ) भागात तरसाने धुमाकूळ घातला असून रात्री पिकांना पाणी देण्यासाठी शेतात गेलेल्या एका शेतकर्‍यावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी करण्याची घटना घडल्याने शेतकर्‍यांसह शेतमजुरांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वी देखील तरसाने या भागात शेतकर्‍यावर हल्ले करत जखमी करण्याच्या घटना घडल्या असल्याने वनविभागाने तरसाला ( Hyena) जेरबंद करावे, अशी मागणी केली जात आहे.

ग्रामीण भागात रब्बीचा हंगाम सुरु झाला असून गहू, कांदे, हरबरा, भाजीपाला यासह इतर पिकांची पेरणी करण्यात आली आहे. मात्र महावितरणकडून दिवसाऐवजी रात्री वीजपुरवठा केला जात असल्यामुळे शेतकर्‍यांना मध्य रात्रीनंतर पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागते. शहरापासून 10 किमी अंतरावर असलेल्या बेजगाव येथे जगन सानप हा शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जात असताना त्याच्यावर तरसाने झडप घेऊन हल्ला केला.

अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे सानप घाबरला त्याला वाटले कि बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. त्यामुळे त्याने आरडाओरडा केला त्याचा आवाज ऐकून इतर शेतकरी त्याच्या मदतीला धावून आले. त्यामुळे घाबरलेल्या तरसाने शेतातून पळ काढला. नागरीक त्वरित धावून आल्यानेच सानप यांचे प्राण वाचले.

तरसाच्या हल्ल्यात सानप गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांना ग्रामस्थांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अगोदर देखील तरसाने या भागात हल्ला करून शेतकर्‍यांना जखमी केल्याच्या घटना घडल्या आहे. रात्री पिकांना पाणी देण्यासाठी जाणे शेतकर्‍यांना भाग आहे. अशातच झाडांमध्ये दबा धरून बसलेल्या हिंस्त्र तरसाद्वारे हल्ले चढविले जात असल्याने शेतकर्‍यांमध्ये भीती पसरली असून वन विभागाने तरसाचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com