कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

चिंचखेड । वार्ताहर Chinchkhed / Dindori

दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे कर्जाला कंटाळून शेतकऱ्यानी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दत्तात्रय बाबुराव लभडे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून ते ५१ वर्षांचे होते.

सविस्तर वृत्त असे की चिंचखेड येथील रहिवासी तसेच अल्पभूधारक शेतकरी दत्तात्रय लभडे यांच्यावर देना बँकेचे नऊ लाख रुपये कर्ज आणि चिंचखेड विविध कार्यकारी सोसायटीचे दोन लाख रुपये कर्ज होते. मध्यंतरी त्यांचे वडील विहिरीत पडल्यामुळे डोक्याला मार लागला असल्याने त्यांचे वडील कोणतेही काम करू शकत नव्हते, घरची सर्वस्व जबाबदारी दत्तात्रय लभडे यांच्यावर होती , त्यानंतर गेल्या चार वर्षांपासून शेतातील सततची नापिकी तसेच द्राक्ष बागेत कोणतेही उत्पन्न मिळत नसल्याने त्यांनी द्राक्षबागेवर काढून टाकली होती.

उत्पन्नाचे कोणतेही पर्याय खुले दिसत नसल्याने नैराश्यातून गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घरात कोणीही नसताना दत्तात्रय लभडे यांनी घरातील छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी,दोन मुले, सून भाऊ,असा परिवार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com