'कलांगण'च्या कार्यक्रमात रसिक मंत्रमुग्ध

'कलांगण'च्या कार्यक्रमात रसिक मंत्रमुग्ध

नाशिक | प्रतिनिधी Nashik

प्रभात दर्शन अर्थात, प्रभात चित्रपट कंपनीच्या सोनेरी इतिहासाची पाने उलगडणारा भव्य दृकश्राव्य अविष्कार. या कार्यक्रमाचा महाराष्ट्रातील दुसरा प्रयोग 'कलांगण'ने नाशिकच्या कालिदास कला मंदिरात सादर केला. नेत्रदीपक आणि श्रवणमनोहर असा हा नृत्य नाट्य व संगीत प्रयोग कलानंदाच्या शिखरावर नेणारा कार्यक्रम ठरला. कार्यक्रमाच्या निर्मात्या, लेखिका, गायिका आणि निवेदिका वर्षा भावे यांनी स्वरालय आणि मनमोहिनी क्रिएशन या दोन संस्थेच्या सहकार्याने प्रभातदर्शन कार्यक्रम सादर केला.

गोपाळ कृष्ण, माणूस, कुंकू, शेजारी, धर्मात्मा, संत सखू, रामशास्त्री, संत तुकाराम अशा अभिनव कथानकानी नटलेल्या प्रभातच्या चित्रपटांनी गाजवलेल्या सुमारे २५ वर्षांचा कालखंड साकारण्याचे शिवधनुष्य त्यांनी कलांगणच्या सुमारे ७५ बाल आणि युवा कलाकार मंडळी आणि लोकप्रिय गायक गायिकांच्या, आणि अत्यंत गुणी वादकांच्या मदतीने लिलया पेलेले.

प्रभात चित्रपट कंपनी विषयी कलांगणच्या संस्थापिका, संचालिका, संगीतकार वर्षा भावे यांनी केलेले संशोधन मूर्त स्वरूपात साकारण्यासाठी तितकेच तोलामोलाचे वाद्यमेळ संयोजन कमलेश भडकमकर यांचे होते. नाट्य दिग्दर्शक सुवर्णगौरी घैसास, अभिजित कांबळी, नृत्यदिग्दर्शिका मनीषा जीत हा अविष्कार वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला. दीपावली निमित्त रसिकांना अशा नयनरम्य, सुश्राव्य कार्यक्रमाची अवित गोडी चाखायला मिळाली आणि नाशिककर दिवाळीची अपूर्व भेट परतताना मनात साठवून गेले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com