कांदा दरात घसरण

क्विंटलमागे अडीच ते तीन हजारांचा तोटा; शेतकरी हवालदिल
कांदा दरात घसरण

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

राज्यासह देशांतर्गत उन्हाळ कांद्याची आवक येण्यास सुरुवात झाल्याने कांद्याच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. गेल्या पंधरवाड्यात चार हजार रुपये क्विंटल दरोने विक्री होणार्‍या कांद्याला 1300 ते 1500 रुपये इतका सर्वसाधारण दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या सिन्नर तालुक्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने तालुक्यातील टंचाई दुर झाली. मुबलक पाणी असल्याने शेतकर्‍यांनी चांगला पैसा मिळेल या आशेने कांद्याचे पिक मोठ्या प्रमाणावर घेतले. दरम्यान मध्यंतरीच्या काळात हवामान बदलामुळे कांदापिकावर करप्यासह विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पादनेत मोठ्या प्रमाणात घट झाली.

मात्र गत पंधरवाड्यात कांद्याचे दर 4 हजारांवर गेल्याने कमी उत्पादनातही चांगला पैसा मिळत असल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावरील हा आनंद जास्त काळ न टिकता राज्यासह परराज्यातील उन्हाळ कांद्याची आवक सुरू होताच कांद्याचे दर कमी होण्यास सुरूवात झाली.

मागील आठवड्यात निम्यावर म्हणजेच 2200 ते 2500 रुपयांवर आलेले कांद्याचे भाव या आठवड्यात आनखी निम्यावर आल्याने सिन्नर बाजारसमितीत सद्या 1300 ते 1500 रुपये इतका कमी दर कांद्याला मिळत आहे. पंधरा दिवसांपुर्वीच्या बाजारभावाची तुलना करता सद्या शेतकर्‍याला क्विंटलमागे अडीच ते तीन हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.

अशी झाली घसरण

दिनांक जास्तीत जास्त सरासरी

22 फेब्रुवारी 4290 3800

25 फेब्रुवारी 2665 2000

2 मार्च 2765 2550

7 मार्च 1685 1450

9 मार्च 1390 1200

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com