टोमॅटो दरात घसरण

मातीमोल भाव मिळत असल्याने उत्पादक संतप्त
टोमॅटो दरात घसरण

देवळाली कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

भांडवली पीक म्हणून ओळख असलेल्या टोमॅटोला ( Tomato ) नाशिक तालुक्यातील गिरणारे, नाशिक मार्केटमध्ये प्रति कॅरेट केवळ 70 ते 100 रुपये भाव मिळाला. यावर्षीचा हा सर्वात कमी भाव असून एकरी 70 ते 80 हजार रुपये खर्चून हाती काहीही लागले नाही. मशागतीपासून रोपे, लागवडीचा खर्च, तार बांबूचा बेसुमार खर्च, कीटकनाशके, खते यासाठी चारपट खर्च करून अतिवृष्टीत नैसर्गिक संकटात वाचवलेले व डोईजड मजुरी पेलत हाती येणार पीक मातीमोल विकत असेल तर शेतकर्‍यांनी डोक्यावर असलेली कर्जाची ओझी कशी फेडायची, असा उद्विग्न सवाल टोमॅटो उत्पादकांनी गिरणारे व्यक्त केली आहे.

दिवसभर राबून टोमॅटो फुकट विकली जात असून टोमॅटोचे पीक असेच मातीत घातल्यागत ही स्थिती असल्याची भावना शिवाजी धोंडगे यांनी व्यक्त केली. दरम्यान खुडलेला टोमॅटो, भाव पडल्याने परत नेला. मात्र नाशवंत माल पुन्हा आणला तर त्यापेक्षा कमी भाव यामुळें पुन्हा चिंता वाढली असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. यंदा सर्वत्र अतिवृष्टीने खरिपाचे अति नुकसान झाले.

या अतिवृष्टीतही नाशिक, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी भागात मोठ्या प्रमाणात टोमॅटो लागवड करण्यात आली. पावसाळी हवामानात नैसर्गिक असमतोल असतांना शेतकर्‍यांनी कीटकनाशके खते यावर तीनपट खर्च केला. अतिवृष्टीतून पोटच्या पोरागत टिकवलेल्या टोमॅटोला सुरुवातीला हजार ते बाराशे भाव होता. मात्र दिवाळीच्या ऐन मोसमात भाव पडायला लागले. बांगलादेशला आयात कर वाढला, लोकल टोमॅटो वाढला, पाकिस्तानात आर्थिक दिवाळखोरीमुळे टोमॅटो थांबला, आदी कारणे यावेळी शेतकर्‍यांच्या चर्चेत होते.

कुठं तरी भाव वाढेल असे असतांना मागील आठवड्यात 400 व या दोन दिवसात थेट 90 ते 100 रुपये भाव मिळाल्याने टोमॅटो उत्पादक कमालीचे चिंतेत असल्याचे चित्र दिसून येते. तसेच मजूर 450 रुपये रोज घेतो. अंगावर काम घेतल्यास प्रति कॅरेट 25 रुपये भाव असल्याने व यंदा भांडवली खर्च वाढल्याने उसनवारी कशी फेडणार, असे शेतकरी भारत पिंगळे यांनी सांगितले.

नैसर्गिक संकटात शेतीमालाला निश्चित बाजारभाव नसल्याने कष्टाने पिकवलेला शेतीमाल मातीमोल जात असल्याने जिल्हा बँकेच्या जप्तीच्या नोटिसाच्या धास्तीत व कर्जात बुडालेला शेतकरी कसा जगेल?

नाना बच्छाव, कार्याध्यक्ष, शेतकरी संघर्ष संघटना

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com