देवळाली छावणीत 'तोतयांचा सुळसुळाट'; दुसरा 'मेजर' पकडला

देवळाली छावणीत 'तोतयांचा सुळसुळाट';
दुसरा 'मेजर' पकडला

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आर्मीचा गणवेश घालून देवळाली लष्करी छावणीत (Deolali military camp) घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या तोतया मेजरला (Fake Major) बेड्या ठोकण्यात आल्या आहेत...

याबाबत अधिक माहिती अशी की, काल (दि. ५) दुपारी देवळाली कॅम्पच्या लष्कराच्या हद्दीतील गेट नंबर 7 येथे ड्युटीवर असलेल्या आर्मीच्या गार्डला अवेंजर या गाडीवर आर्मी असे लिहिलेला व्यक्ती मोहम्मदअसद मुजिबुल्लाखान पठाण, मौलाना (रा. रेहमान नगर, देवळाली कॅम्प) दिसला.

या आर्मी गार्डने त्याला त्याचे ओळखपत्र (Identity Card) मागितले. यावेळी त्याने मी माजी सैनिक (Ex-serviceman) आहे आणि एक्स इंडियन आर्मी सिक्युरिटी सर्व्हिसेस अशा नावाचे ओळखपत्र दाखवले. ओळखपत्र बनावट आहे हे लक्षात आल्यानंतर आर्मी जवानाने आर्मी इंटेलिजन्स दक्षिण कमांड पुणे यांच्या देवळाली कॅम्प येथील पथकाला आणि लष्करी पोलिसांना सांगितले.

आर्मी इंटेलिजन्स आणि लष्करी पोलिसांनी या व्यक्तीची चौकशी केली. त्यावेळी त्याने सांगितले की, हे ओळखपत्र आफताफ मन्नान शेख उर्फ मेजर खान (रा. आडकेनगर, देवळाली कॅम्प) याने बनवले आहे. मिलिटरी इंटेलिजन्स तोतया मेजर खानचा एक वर्षापासून शोध घेत होते. परंतु त्याला पकडण्यात अपयश येत होते.

मेजर खान (Major Khan) या व्यक्ती चौकशीसाठी बोलावले असता तो महिंद्रा कंपनीच्या एका मोठ्या गाडीतून आला. या गाडीवरदेखील ‘आर्मी’ असे लिहलेले होते. चौकशीदरम्यान खान याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

दोघांचेही मोबाईल तपासले असता त्यात आर्मी युनिफॉर्म घातलेले फोटोज, ओळखपत्र आणि तोतया मेजर खान यांचे संशयास्पद फोटो आढळून आले आहे. याबाबत देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

नऊ दिवसांत दुसरी घटना

दि. २८ डिसेंबरला तोतया मेजर गणेश वलू पवार याला नाशिकरोड तोफखाना केंद्रात रेकी करीत, आर्मीचा गणवेश घालून लष्कराच्या छावणीत फिरताना अटक करण्यात आली होती. गेल्या ९ दिवसातील ही दुसरी घटना आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com