बनावट इ-पास बनविणाऱ्यास गुहागर येथून अटक

शहर गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई
बनावट इ-पास बनविणाऱ्यास गुहागर येथून अटक

नाशिक | Nashik

कराेना संकटामुळे केलेल्या लाॅकडाऊनमध्ये सर्व सामान्यांना अत्यावश्यक परिस्थितीत प्रवास करण्यासाठी पाेलीसांकडून इ पास गरजेचा करण्यात आला हाेता. मात्र याचा गैरफायदा घेऊन बनावट इ-पास बनवून देणाऱ्या एकाला शहर गुन्हे शाखा युनिट एकने पकडले आहे.

कृष्णा उर्फ राकेश सदानंद सुर्वे (३२, मूळ रा. पडवे ता. गुहागर, जि. रत्नागिरी, हल्ली रा. डोबिंवली (पू) आजदेगाव जि. ठाणे) असे या संशयिताचे नाव आहे.

अत्यावश्यक सेवेसाठी शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने करोना मदत कक्ष स्थापण करण्यात आला होता. या कक्षा तर्फे नागरिकांना प्रवाशी वाहनासाठी इ पास देऊनच परवानगी देण्यात येत होती. मागील काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर इ पास काढून देण्यासंदर्भात एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.

यात पास काढण्यासाठी २ हजार रुपये लागतील असे सांगितले जात हाेते. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास गुन्हे शाखा युनिट एकने करून रत्नागिरीतील गुहागर तालुक्यातील पडावे येथून संशयिताला ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक बलराम पालकर, दिलीप मोढे, विशाल देवरे, गणेश वडगे यांनी केली.

संशयिताने १५ प्रवाशांना इ पास काढून दिल्याची कबूली दिली आहे. त्याच्याकडून मोबाइल व टॅब जप्त करण्यात आला असून न्यायालयात हजर केले असता त्याला शनिवारी (दि. २९) पर्यंत पोलिस काेठडी देण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com