करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अपयश
नाशिक

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अपयश

मनसेनेचा आंदोलनाचा इशारा

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात जिल्हा व मनपा प्रशासनाला आलेल्या अपयशामुळे नाशिककरांच्या जीवावर भयंकर संकट आले आहे. ही परिस्थिती लवकर नियंत्रणात न आणल्यास आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्‍यांनी काल पत्रकार परिषदेत दिला आहे.

करोनाला नियंत्रण आणण्यात राज्य सरकारसह जिल्हा प्रशासन व महानगरपालिका अपयशी ठरली आहे. असा आरोपदेखील यावेळी करण्यात आला. सामान्य जनतेला करोनाची भीती दाखवून नाशिककरांची होणारी लूट बंद करा, राज्य शासनाने घोषित केल्यानुसार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून करोनाबाधितांचा सर्व खासगी रुग्णालयात मोफत उपचार व्हावा, जिल्हा व शहरातील खासगी रुग्णालयात शासन धोरणानुसार २० % आरक्षित खाटा उपलब्ध आहेत का? त्याची चौकशी करून काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी,

करोना रुग्णांच्या हतबल नातेवाईकांकडून खासगी रुग्णालय व्यवस्थापनाकडून कमीत कमी ५ ते २० लाख रुपयांपर्यंत बिल आकारणी केली जाते, त्यावर प्रशासनाचे कुठलेही निर्बंध नसून यावर तत्काळ चाप बसवावा, करोना संबंधित सर्व औषधे (मेडिसीन), इंजेक्शन, ऑक्सिजन सिलिंडर, वेंटिलेटर, सॅनिटायझर व मास्क यांचे दर सर्वसामान्यांना परवडतील असे करावे, करोनाला प्रतिबंधक म्हणून लागणार्‍या औषधांचा तुटवडा व काळाबाजार शासनाने रोखावा आणि तसे आढळल्यास जीवनरक्षक औषध कायद्यानुसार संबंधितांवर कडक कारवाई करावी, किमान शासकीय दर हे प्रत्येक खासगी रुग्णालयांसाठी बंधनकारक करावे व त्याचे पालन न झाल्यास गुन्हे दाखल करून मान्यता रद्द करावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

मागण्याची दखल घेऊन लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात व नाशिककरांची होणारी लूट थांबवावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी डॉ. प्रदीप पवार, माजी महापौर अशोक मुर्तडक, अ‍ॅड. रतनकुमार इचम, अनंत सूर्यवंशी, दिलीप दातीर, अंकुश पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com