हमीभावाने भरड धान्य नोंदणीस मुदतवाढ

हमीभावाने भरड धान्य नोंदणीस मुदतवाढ

पंचाळे । वार्ताहर Panchale

खरीप हंगाम 2022-2023 ( Kharif Season-2022-2023 ) साठी विकेंद्रित हमीभावाने ( guaranteed price)धान व भरड धान्य ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्याची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे अधिकारी विवेक इंगळे यांनी दिली.

केंद्र शासनाच्या कार्यकक्षेत असलेल्या मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून दरवर्षी राज्यामध्ये हमीभावाने शासनामार्फत मका, बाजरी, सोयाबीन खरेदी करण्यात येते. शासनाने यावर्षी हमीभावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना वाढीव भावाचा फायदा व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून दोन महिन्यांपासून राज्यामध्ये खरेदी केंद्रांच्या वतीने ऑनलाईन पद्धतीने नोंदणी प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

मात्र, यावर्षी 21 ऑक्टोबरपर्यंत पर्जन्यवृष्टी होत असल्याने खरीप हंगामातील पिके काढण्यासाठी शेतकर्‍यांना पर्याय नव्हता. त्यामुळे मका, सोयाबीन या पिकांची काढणी उशिरा झाली. अद्यापही शेतामध्ये पाणी असल्याने मका व सोयाबीन काढणीचे काम खोळंबले आहे. त्यामुळे ही परिस्थिती पाहून शासनाच्या वतीने तिसर्‍यांदा ऑनलाईन पद्धतीने नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये खरेदी केंद्रांवर ज्वारीसाठी 79, बाजरीसाठी 57 शेतकर्‍यांनी आतापर्यंत ऑनलाईन नोंदणी केली आहे. यापूर्वी नोंदणीची 10 नोव्हेंबरपर्यंत मुदत होती.

मागील वर्षाचा ऑनलाईन पोर्टलवरील नोंदणीचा अहवाल पाहता पुन्हा नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शेतकर्‍यांना हमीभावाचा लाभ होण्यासाठी संबंधित खरेदी केंद्रांनी शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करून नोंदणीसाठी प्रोत्साहित करण्याचे आदेश जिल्हा खरेदी केंद्रांना देण्यात आले आहेत.

संतोष कराड, अवर सचिव, महाराष्ट्र शासन

नाशिक जिल्ह्यामध्ये असलेल्या आठ केंद्रांवर मका पिकासाठी सिन्नर तालुक्यातील 19, येवला 92, चांदवड 84, मालेगाव 388, नांदगाव 108, सटाणा 31, नामपूर 179, देवळा 9 अशा एकूण 910 शेतकर्‍यांनी 10 नोव्हेंबरपर्यंत नोंदणी केली आहे. अल्प प्रमाणात नोंदणी होत असल्याने व शेतकर्‍यांनी नोंदणीकडे पाठ फिरवल्याने शासनाच्या हमीभावाचा जास्तीत जास्त शेतकर्‍यांना लाभ व्हावा म्हणून नोंदणीची मुदत वाढवून देण्यात आली आहे.

विवेक इंगळे, जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com