पॉलिटेक्निकच्या नोंदणीला मुदतवाढ

पॉलिटेक्निकच्या नोंदणीला मुदतवाढ
आयटीआय

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्यात पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या 1 लाख 17 हजार जागांसाठी 90 हजारापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

गेल्या काही वर्षात विद्यार्थ्यांनी तंत्रनिकेतनकडे पाठ फिरवल्यानंतर यंदा मात्र मोठ्या प्रमाणावर नोंदणी करण्यात आली आहे. त्यामुळे नोंदणीला 21 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रवेशाचे चित्र गेल्या पाच वर्षात आशादायी नाही. अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक आणि इतर अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली. यामुळे या अभ्यासक्रमात रिक्त जागांची संख्या गेल्या पाच वर्षात बरीच मोठी आहेत.

या प्रकाराने पाच वर्षात किमान पन्नासाहून अधिक महाविद्यालये बंद पडली, तर अनेक महाविद्यालयांनी या अभ्यासक्रमातील शाखा बंद करण्याचे प्रस्ताव विद्यापीठ आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडे दिले आहेत. मात्र, यावर्षी दहावीचा निकालात वाढ झाली.

त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढण्याची शक्यता होती. त्यानुसार आतापर्यंत 90 हजारांवर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यावर्षी करोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता विभागाने तंत्रनिकेतन अभ्याक्रमाचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला. यामुळे यावर्षी विद्यार्थ्यांना घरून अर्ज भरता येणे शक्य आहे. त्यासाठी आता 21 सप्टेंबरपर्यंत अर्ज नोंदणीला मुदतवाढ दिली आहे.

ऑनलाईन अर्ज भरणे व निश्चित करणे याकरिता उमेदवाराच्या सोयाीनुसार‘इ- स्क्रुटनी’ व ‘प्रत्यक्ष स्क्रुटनी’ छाननी पद्धतीची माहिती, प्रवेशासाठीचे पात्रतेचे निकष, अर्ज भरण्यासाठी शुल्क, उमेदवारासाठी महत्वाच्या सूचना इत्यादी सर्व बाबी संचालनालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या दिनांक 7 ऑगस्ट 2020 च्या वेळापत्रक परिपत्रकानुसार राहणार आहे.

कॅपच्या विविध फेरीकरिता ऑप्शन फॉर्म भरणे, कॅप जागावाटप, जागा स्विकृती, उमेदवाराने उपस्थित राहणे, प्रवेशाची अंतिम तारीख इत्यादीबाबतचे पुढील वेळापत्रक अतिम गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानतर घोषित केले जाईल, असे तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी कळविले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com