हमीभावाने मका खरेदी नोंदणीस मुदतवाढ

हमीभावाने मका खरेदी नोंदणीस मुदतवाढ

पंचाळे । वार्ताहर Panchale

हमीभावाने पणन मंडळाच्यावतीने करण्यात येणार्‍या मका खरेदीसाठी maize purchase नोंदणीची मुदत 15 ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आल्याने मका उप्तादक शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

केंद्र शासनाच्या मार्केटिंग फेडरेशनच्यावतीने दरवर्षी भरड धान्य खरेदी करण्यासाठी शेतकर्‍यांकडून नोंदणी प्रक्रिया राबविली जाते . जिल्ह्यातील तालुका खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयात त्याबाबत शेतकर्‍यांनी कागदपत्रे जमा करून आपल्या पिकांची नोंद करणे गरजेचे असते.

नाशिक जिल्ह्यात मका पिकासाठी यापूर्वी 11 सप्टेंबरपासून 30 सप्टेंबरपर्यंत हमीभावाने मका नोंदणीसाठी मुदत देण्यात आली होती. मात्र, ई- पिक नोंदणीमुळे अनेक शेतकरी नोंदणी करण्यापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांनी मका नोंदणीसाठी वाढीव मुदत देण्याची मागणी केली होती.

शेतकर्‍यांची मागणी विचारात घेऊन राज्य शासनाने 15 ऑक्टोबरपर्यंत मका खरेदी व भरड धान्य खरेदीची मुदत वाढवली आहे. सिन्नर तालुका खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून दरवर्षी खरीप व रब्बी मका खरेदीचे काम केले जाते. यासाठी हजारो शेतकरी मका नोंदणी करतात. मात्र, शासनाचे उद्दिष्ट ठराविक असल्याने तीस ते पस्तीस टक्के शेतकर्‍यांना या मका नोंदणीचा व त्याच्या हमीभावाचा दरवर्षी फायदा होत असतो. त्यामुळे शेतकर्‍यांनी यावर्षी तालुका खरेदी विक्री संघाच्या कार्यालयाकडे मका नोंदणीसाठी पाठ फिरवल्याचे लक्षात येत असून आतापर्यंत फक्त 100 शेतकर्‍यांनी नोंदणी केली आहे.

बारदानाची टंचाई निर्माण होत असल्यामूळेही वैतागलेले शेतकरी खुल्या बाजारात बाराशे ते तेराशे रुपये क्विंटल दराने मक्याची विक्री करून त्याचा पैसा मोकळा करून घेतात. त्यामुळे पनण महामंडळाने हमीभाव खरेदी योजनेत नियमितपणा व नियोजनबध्द कारभार करणे गरजेचे असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.