फाइन आर्ट अ‍ॅण्ड डिझाईन प्रवेशाला मुदतवाढ

फाइन आर्ट अ‍ॅण्ड डिझाईन प्रवेशाला मुदतवाढ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सीईटी ( CET ) सेलमार्फत नुकतीच फाइन आर्ट अ‍ॅण्ड डिझाईन (Fine Art and Design ) विषयाच्या पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ( Admission Process )सुरू करण्यात आली आहे. या विद्याशाखेत प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना 28 जुलैपर्यंत प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहेत. तसेच लेट फी भरून अर्ज करण्यासाठी 4 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) फाइन आर्ट्स अ‍ॅण्ड डिझाइनच्या पदवी प्रवेशांसाठी घेण्यात येणार्‍या प्रवेश परीक्षा, परीक्षा केंद्रांवर प्रत्यक्षपणे घेण्यात येणार आहेत. या परीक्षेत प्रात्यक्षिकांवर भर दिला जाणार असल्याने विद्यार्थ्यांनी निवडलेल्या केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार असल्याचे सीईटी सेल मार्फत जाहीर करण्यात आले आहे.

प्रवेश परीक्षेमध्ये तीन प्रात्यक्षिक आणि एक लेखी विषयाचा समावेश करण्यात आला आहे. डिझाइन प्रॅक्टिकल, ऑब्जेक्ट ड्रॉइंग प्रॅक्टिकल आणि मेमरी ड्रॉइंग प्रॅक्टिकल असे प्रात्यक्षिकांचे विषय असून, प्रत्येक विषयासाठी 50 गुण देण्यात येणार आहेत. परीक्षेचा शेवटचा पेपर सामान्य ज्ञानाचा लेखी पेपर असून, तो 40 गुणांचा असणार आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीने हा लेखी पेपर घेतला जाणार आहे. परीक्षेचा अर्ज करून शुल्क भरल्यानंतर विद्यार्थ्यांंना परीक्षा केंद्राची निवड करावी लागणार असून, याच केंद्रांवर प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

राज्यातील सरकारी व खासगी कला महाविद्यालयांमध्ये फाइन आर्ट्स, डिझाइन या सारख्याअभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी ही परीक्षा उपयुक्त ठरणार आहे. या परीक्षेसाठी कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहेत. या विद्यार्थ्यांना किमान 45 टक्के गुण मिळणे बंधनकारक आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com