
नाशिक | प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील ४०१ शाळांमधील शिक्षण हक्क (आरटीई) यंदा २५ टक्के अंतर्गत राखीव असलेल्या ४ हजार ८५४ जागांवर विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिले जाणार आहेत. आरटीई प्रवेशांसाठी दरवर्षी तब्बल १५ ते २० हजार पालकांचे अर्ज करतात. त्यामुळे प्रवेश मिळवण्यासाठी पालकांना मोठी कसरत करावी लागते.
प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क मिळावा, या उद्देशाने शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) शाळांमध्ये आर्थिक व दुर्बल घटकांतील मुलांसाठी २५ टक्के जागा राखीव असतात. मागील वर्षी डिसेंबर महिन्यातच आरटीई प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले होते. जानेवारीमध्ये शाळांची नोंदणी प्रक्रियाही पूर्ण झाली होती. शालेय शिक्षण विभागातर्फे २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाच्या आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी शाळांची नोंदणी प्रक्रिया करण्यात आली.
नाशिक जिल्ह्यातील ४०१ शाळांची नोंदणी झाली असून या शाळांनी आरटीई पोर्टलवर ४ हजार ८५४ पटसंख्येची नोंदणी केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी नोंदणीसाठी शाळांचा प्रतिसाद सुरुवातीपासून कमी राहिला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २२ शाळांची नोंदणी कमी झाली आहे.
सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेंतर्गत ऑनलाइन सोडतीद्वारे निवड झालेल्या निवड यादीतील बालकांच्या कागदपत्रांची तपासणी करून प्रवेश निश्चिती करण्यासाठी व बालकांच्या प्रवेशासाठी आता १५ मे पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.
पालकांनी आपल्या पाल्याचा शाळेत प्रवेश घेण्यासाठी अगोदर ३० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, प्रवेश प्रक्रियेच्या संगणकीय प्रणालीवर अतिरिक्त भार येत असल्याने आरटीई पोर्टल अतिशय संथ गतीने सुरू होत असल्यामुळे पालकांना प्रवेश निश्चित करण्याची कार्यवाही करता येत नसल्याचे ८ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र या काळातही बहुतांश पालकांना प्रवेश घेता आले नसल्यामुळे आता पुन्हा १५ मे पर्यंत प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
आरटीई प्रवेशासंदर्भात शिक्षण विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या असतील तर त्या सुनावणी घेऊन १५ मे पूर्वीच निकाली काढाव्यात, अशा सूचना शिक्षण संचालकांनी केल्या आहेत. तसेच ऑनलाइन सोडतीद्वारे निवड झालेल्या प्रतीक्षा यादीतील बालकांच्या प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे पालकांनी आवश्यक कागदपत्र तयार ठेवावेत, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.