विस्तारीत रस्ता वाहतूकीसाठी असुरक्षितच

आवश्यक ठिकाणी गतिरोधक; अपूर्ण कामे कधी होणार?
विस्तारीत रस्ता वाहतूकीसाठी असुरक्षितच

दिंडोरी | प्रतिनिधी | DINDORI

राष्ट्रीय महामार्ग क्र.३ वरील दहावा मैल फाटा ते विमानतळ रस्ता नागरिकांसाठी असुरक्षितच वाटत कारण रस्त्याचे काम पूर्ण झाले परंतू ठिकठिकाणी राहिलेल्या चुकांमुळे वाहनधारकांची तारांबळ उडत आहे.

प्रमाणपेक्षा जास्त दुभाजकांमध्ये रस्ता ओलांडण्यासाठी जागा, विमानतळ रस्त्याच्या सुरुवातीलाच एका बाजूने विद्यूत खांबाचे स्थलांतर नाही, एका बाजूचे कमान लावलेले नाही, व्यवसायिकांचे अतिक्रमण तसेच आवश्यक ठिकाणी गतिरोधकांची कमतरता, जानोरी चौफुली तसेच कार्गो सेवा गेटवरील चौफुलीवर गतिरोधक नसल्याने येणार्‍या - जाणार्‍यांचा वाहनाचा अंदाज येत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सध्या विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमानतळ नावाचे फलक भुषणावह दिसते. परंतू वाहनधारकांसाठी असलेल्या रस्त्याबाबत होत असलेल्या निष्काळजीपणे डोळेझाक न करता संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

जानोरी चौफुलीवर गतिरोधक टाकावे अशी अनेक दिवसांपासून मागणी होत आहे. परंतू डांबर नसल्याचे कारण पुढे करुन त्या गतिरोधकांना अद्यापपर्यंत मुहूर्त लागलेला नाही. चौफुलीवरती आजही अंधाराचे साम्राज्य आहे. तेथे पथदिप लावलेले नाही. रात्रीच्या सुमारास भरधाव वेगाने वाहने येतात. त्यावेळी गावातून रस्त्यावर येत असलेले वाहन त्यांना दिसत नाही. अचानक वाहन समोर आले तर वाहनचालकाचा ताबा सुटून अपघात होतो. येथे सर्कल तयार करुन आजूबाजूला बसवावे, अशी मागणी केली जात आहे.

त्याचबरोबर कार्गो गेट वरील चौफुलीवर सर्कल बांधण्यात आले असून त्या सर्कलची उंची जास्त असल्याने समोरच्या वाहनाचा अंदाज येत नाही. त्याचबरोबर आजूबाजूला दुभाजक नसल्याने वाहने वळण घेतांना समोरच्या वाहनाचा अंदाज न घेता वळविली जातात व त्यातून समोरुन येणार्‍या वाहनाला धडक देत अपघात होत असतात.अपघातातून जीव गमवावा लागला असून काहींना तर कायमचे अपंगत्व आले आहे. तरी देखील या चौफुलीवर आवश्यक त्या उपाययोजना झालेल्या नाहीत.

तसेच मोहाडी ते दहावा मैलकडे जाणारे वाहने तसेच अक्राळे फाट्याकडे वळणारे वाहने तसेच ओझरकडे वळणारे वाहने हे मोठ्या प्रमाणात असल्याने या चौफुलीवर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे वाहतूकीच्या दृष्टीकोनातून आवश्यक खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. वाहतूकीच्या नियमाप्रमाणे आवश्यक ठिकाणी गतिरोधक तसेच सर्कलला वळण घेत असतांना आवश्यक सूचना आदी उपाययोजना होणे आवश्यक आहे. परंतू मागणी व तक्रारी करुन देखील येथे उपाययोजना होत नाही. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांसाठी हे धोकादायक बनले असून आणखी किती निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा संबंधित विभाग उपाययोजना करेल असा संप्तत सवाल विचारला जात आहे.

या विमानतळावर कायम मंत्र्यांची रेलचेल असते. यावेळी प्रत्येक चौफुली तसेच अपघातग्रस्त ठिकाणी पोलिसांना उभे केले जाते. मंत्री महोदय येण्यापासून ते जाण्यापर्यंत येथे पोलिस कर्मचारी आपली ड्यूटी बजावत असतात. रात्रीच्या वेळी तर अंधारात पोलिस कर्मचारी पहारा देत असतात. मंत्री महोदयासाठी कर्मचारी आवश्यक ती खबरदारी घेवून मंत्र्यांना सुखरुप विमानतळापर्यंत सोडतात. परंतू सर्व सामान्य नागरिकांना सुखरुप प्रवास करण्याची हमी कोण घेईल ? हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे फक्त मंत्री महोदयाचेच नाही तर सर्व सामान्य नागरिकांची त्याच दृष्टीने काळजी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दहावा मैलपासून विमानतळाच्या रस्त्याला सुरवात होताच लावलेली कमान ही एका बाजूने आजही अपुर्ण आहे. विमानतळाला आंतरराष्ट्रीय नाव दिले असले तरी रस्ता मात्र आजही असुरक्षितच आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्यूत खांब देखील अद्यापपर्यंत इतरत्र ंहलवले नाही. त्यामुळे वाहनधारक त्या विद्यूत खांबावर धडकण्याची दाट शक्यता आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाले असतांना संबंधित ठेकेदाराने अपूर्ण काम सोडून काम काढला ? त्यावर काही कार्यवाही झाली का? हे मात्र गुलदत्यात आहे. नाशिक विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव दिले आहे. त्या नावाप्रमाणे रस्त्याचे काम व वाहनधारकांची काळजी संबंधित विभागाने घेणे अपेक्षित आहे. तरी संबंधित विभागाने या रस्त्याची विशेष काळजी घेत निष्पाप लोकांना अपघात जीव गमवावा लागणार नाही याबाबत खबरदारी म्हणून आवश्यक गतिरोधक व आवश्यक सूचनांचे फलक आदी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातून केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com