500 चौ. फुटापर्यंत घरांना मालमत्ता कर माफ करा

महासभेवर प्रस्ताव ठेवण्याचे महापौरांचे आदेश
500 चौ. फुटापर्यंत घरांना मालमत्ता कर माफ करा
नाशिक मनपा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मुंबई (Mumbai) महापालिकेने पाचशे चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर (Property tax) रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार निवडणुकीच्या (Election) तोंडावर नाशिक महापालिकेतील (Nashik NMC) सत्ताधारी भारतीय जनता पक्षानेही (BJP) मालमत्ता कर माफीची गुगली टाकली आहे...

शहरातील 500 चौरस फुटापर्यंतच्या सदनिकांना मालमत्ता कर माफ करण्यात यावा, अशी मागणी महापौर सतीश कुलकर्णी (Satish Kulkarni) यांनी महापालिका आयुक्त कैलास जाधव (Kailas Jadhav) यांच्याकडे केली आहे. याबाबतचे लेखी पत्र त्यांना दिले.

नाशिक महानगरपालिकेने शहरातील 500 चौ. फूट मध्यम वर्गीय मालमत्ता धारकास एप्रिल 2022 पासुन मालमत्ता कर माफ करण्यासाठीचा प्रस्ताव प्रशासनाने पुढच्या महासभेवर ठेवावा, यासाठी महापालिका आयुक्त जाधव यांनी कार्यवाही करावी, असे महापौर सतीश कुलकर्णी यांनी पत्रात म्हटले आहे.

मुंबई महानगरपालिकेने 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रदद करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे गरीब व मध्यम वर्गीय कुटुंबांना मालमत्ता कराची माफी मिळाली असल्याने त्यांचा कुटुंबांना मोठा आर्थिक हातभार लाभला आहे.

करोनाकाळात (Corona) गरीब व मध्यम वर्गीय कुटुंबांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. बहुतांश लोकांचे रोजगार व नोकर्‍या गेल्या आहेत. त्यामुळे त्यांना पालक संस्था नात्याने दिलासा देणे गरजेचे आहे.

नाशिक महानगरपालिका अंतर्गत शहरातील एकुण मिळकतींपैकी 40 ते 45 टक्के मिळकती या 500 चौरस फुटांपर्यंत आहेत. अशा कुटुंबांना नाशिक महानगरपालिकेने गरीब व मध्यमवर्गीयांना मालमत्ता कर माफ केल्यास मोठा दिलासा मिळणार आहे.

शहरातील 1 लाख 60 हजार घरांना वाढीव घरपटटी अनेक वर्षांपासून लागू झालेली नाही व शहरात नव्याने विकसीत झालेल्या बर्‍याच मिळकती अशा आहेत की ज्यांना मालमत्ता कराची आकारणी अद्याप करण्यात आली नाही. त्यामुळे या दोन्ही गोष्टी शक्य झाल्यास महानगरपालिकेच्या मालमत्ता कराच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते.

मनपाला 600 कोटी मिळणार

नाशिक महानगरपालिकेचे नव्याने उभारण्यात येणारे आयटी हब, लॉजिस्टीक पार्क तसेच शहरातील 22 भुखंड बीओटी तत्वावर विकसीत केल्यास या तीनही प्रकल्पातून नाशिक महानगरपालिकेला जवळपास 500 ते 600 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. या माध्यमातून मिळणार्‍या उत्पन्नाच्या तुलनेत मालमत्ता कराची रक्कम माफ केल्यास नाशिक महानगरपालिकेचे खूप काही नुकसान होणार नाही.

- सतीश कुलकर्णी, महापौर

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com