जलजीवन मिशन प्रभावीपणे राबवा

पाणीपुरवठा विभाग आढावा बैठकीत भुसेंचे निर्देश
जलजीवन मिशन प्रभावीपणे राबवा

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

तालुक्यातील सर्व गावांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी शासनाच्या जलजीवन मिशन ( Jaljivan Mission )कार्यक्रमांतर्गत प्रत्येक घराला पिण्याचे पाणी मिळण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने सर्वतोपरी प्रयत्न करत जलजीवन मिशन कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावेत, असे स्पष्ट निर्देश बंदरे-खनिकर्म मंत्री दादा भुसे (Ports and Mines Minister Dada Bhuse)यांनी येथे बोलतांना दिले.

येथील शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापन व ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाच्या जलजीवन मिशन आढावा बैठकीचे आयोजन ना. दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी उपस्थित अधिकार्‍यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. बैठकीस मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी, जल व्यवस्थापन उपविभाग कार्यकारी अभियंता सुनंदा नरवाडे, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग कार्यकारी अभियंता पी.सी. भांडेकर, उपअभियंता अरविंद महाजन, शाखा अभियंता के.आर. दाभाडे, ए.एन. पगार आदी अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापन उपविभागाचे कार्यकारी अभियंता सुनंदा नरवाडे, पी.सी. भांडेकर यांनी तालुक्यातील गावांसाठी केलेल्या जलव्यवस्थापनाबाबतची सविस्तर माहिती दिली.

दहिवाळसह 25 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना जलजीवन मिशनमध्ये या गावांना नवीन पंप बसविणे तसेच नवीन पाईप टाकून टाक्यांची निर्मिती करणे व नळ कनेक्शन देणे आदी कामे तातडीने करून शुध्द पाणीपुरवठा प्रत्येक घरास कसा होईल या दृष्टीकोनातून पाणीपुरवठा विभागाने लक्ष देण्याची गरज असल्याचे ना. भुसे यांनी यावेळी स्पष्ट केले.

काही गावांना दहा ते पंधरा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे त्यामुळे ग्रामस्थांचे विशेषत: महिला भगिनींचे हाल होतात. हा पाणीपुरवठा दररोज किंवा दिवसाआड होण्याच्या दृष्टीकोनातून देखील अधिकार्‍यांनी प्रयत्न करीत त्यावर तातडीने अंमलबजावणी करावी. तसेच ज्या गावांना पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत किरकोळ समस्या भेडसावत आहेत त्या सोडविण्याच्या दृष्टीकोनातून त्वरीत लक्ष घालावे, अशी स्पष्ट सुचना भुसे यांनी उपस्थित अधिकार्‍यांना दिली.

जलजीवन मिशन योजनेत तालुक्यातील सर्व गावांचा समावेश झाला पाहिजे. तसेच ज्या गावांचा समावेश झालेला नसेल अशा गावांची पाणीपुरवठा विभागाने खातरजमा केली पाहिजे. गावाच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन करतांना संबंधित गावांना देखील विश्वासात घेण्याची गरज आहे. जिथे नवीन वस्ती झाली असेल तेथील पिण्याच्या पाण्याबरोबर इतर मूलभूत सुविधा देखील कशापध्दतीने तात्काळ उपलब्ध करून दिल्या जातील याचे नियोजन करीत सदर सुविधा त्वरीत देण्याच्या सुचना भुसे यांनी अधिकार्‍यांना दिल्या.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com