वात्सल्याचे गाव हरवले!

वात्सल्याचे गाव हरवले!

नाशिक । प्रतिनिधी Nashik

देवा आम्हाला हसायला शिकव पण आम्ही कधी रडलो होतो याचा विसर पडू देऊ नकोस अशी भावना नेहमी व्यक्त करणार्‍या सिंधुताई सपकाळ Sad Demises of Sindhutai Sapkal अनंतात विलीन झाल्या आहेत. हजारो अनाथांवर त्यांनी आपल्या मायेचा पदर पांघरला. समाजसेवेचा घेतला वसा कधीही टाकला नाही.

अनाथांसाठी समाजापुढे कायम पदर पसरला. कपडे भरपूर मिळतात. जेवणाखाण्याचीही सोय होते, तुम्ही माझ्या मुलाबाळांचे नातलग व्हा, असे त्या म्हणायच्या. त्यांनी स्थापन केलेल्या संस्थांना समाजाने मदतीचा हात द्यावा यासाठी त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला होता. त्यामुळेच त्यांच्या जाण्याने वात्सल्याचे गाव हरवले अशीच सर्वांची भावना झाली आहे. त्यांच्या संपर्कात एकदा आलेली व्यक्ती त्यांना कधीही विसरू शकत नाही.

‘देशदूत’च्या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन कार्यक्रमाच्या सिंधुताई प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी केलेल्या भाषणाने मदेशदूतफच्या वाचकांचा आणि नाशिककरांच्या हृदयाचा खर्‍या अर्थाने ठाव घेतला होता. चांगला वक्ता एका भाषणाने श्रोत्यांना किती प्रभावित करू शकतो याचे वेगळेच उदाहरण त्या दिवशी श्रोत्यांना बघायला मिळाले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या समाजकार्यासाठी मदतीचे थेट आवाहन केले होते. त्याला श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. कार्यक्रम संपेपर्यंत तिथे लाखभराच्या देणग्या जाहीर झाल्या होत्या. आणि नंतरही वर्ष-दोन वर्षे त्यांना नाशिक जिल्ह्यांमधून अनेक कार्यक्रमांची आमंत्रणे दिली गेली होती. आणि त्या कार्यक्रमांमध्ये लोकांनी देणग्यांच्या रूपाने त्यांना भरघोस मदत केली होती. निरलस सेवाकार्य आणि प्रभावी वक्तृत्व जनतेला केवढे प्रभावित करु शकते हे त्यावेळी सिद्ध झाले. त्यामुळे एका चांगल्या कामाला हातभार लावल्याचे समाधान सर्वानाच मिळाले होते. ही किमया ज्यांनी घडवली त्या महान व्यक्तिमत्वाला प्रणाम!

देवकिसन सारडा Devkisan Sarda

जीवन शिक्षण अंकासाठी त्यांची मुलाखत घेण्यासाठी मी गेल्या वर्षी त्यांना भेटले होते. पहिल्या भेटीतच त्यांनी मला आपलेसे करून घेतले. ती माझी आणि त्यांची पहिली भेट आहे हे मी विसरूनच गेले. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटला. वयाच्या सत्तरीनंतरही मेळघाटमधील कुपोषित मुलांसाठी काम सुरु करण्याची दुर्दम्य इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. सुरुवातीपासूनच शिक्षणक्षेत्रात काम करते आहे. गरीब मुलांबद्दल आपुलकीची भावना आहेच. त्यांचे शिक्षणाशी नाते जोडण्यासाठी काम सुरु आहे. पण एखादी चौथी पास व्यक्ती हजारो मुलांच्या शिक्षणासाठी इतके काम करू शकते मग शिक्षणक्षेत्रात काम करताना जी मुले अजूनही रस्तावर राहातात, जे शिक्षणापासून दूर आहेत. त्यांना या प्रवाहाशी जोडण्यासाठी जास्त तळमळीने काम करण्याची प्रेरणा मिळाली.

डॉ.किरण धांडे, उपविभागप्रमुख, प्रसारमाध्यम विभाग, जीवनशिक्षण.

नाशिकच्या आधारआश्रमात त्या जेव्हा आल्या होत्या तेव्हा मी त्यांना पहिल्यांदा भेटलो. त्यांच्या विचारांनी मला समृद्ध केले. त्यांची अनेक व्याख्याने ऐकली. मलाही त्यातून मोठी प्रेरणा मिळाली. अनाथांसोबतच प्रत्येक मुलाला, मुलीला शिक्षण समृद्ध करणे हा त्यांचा शिक्षणाबाबतचा महत्वाचा पैलू होता. त्यांना वाचनाची प्रचंड गोडी होती. अनेक दिग्गजांचे बोल त्यांच्या तोंडपाठ होते. एकवेळ विद्यार्थी शिक्षकांचे ऐकणार नाही पण माईचे व्याख्यान झाले तर लगेच अभ्यासाला लागणार असे अनुभव अनेकदा आले आहेत.

सचिन जोशी, शिक्षण अभ्यासक

कालिदास कालामंदिर येथे एका कार्यक्रमात सिंधुताईंची भेट झाली होती. त्यावेळी मला त्या म्हणाल्या होत्या, मया वयातही तूमच्याकडून चांगलेच काम होत आहेफ. त्यांच्या या वाक्यांनी मला काम करण्याची ऊर्जा मिळाली. आजही त्यांची ती वाक्ये आठवली की कामाची प्रेरणा मिळते. ममी माय पण कोणत्याही लेकरांना आथिर्क पाठबळ देणारा बाप हवा असतो, ते कर्तव्य तुम्ही पार पाडा असा सल्लाही त्यांनी दिला होता.

भिकुबाई बागुल, उपमहापौर नाशिक महानगरपालिका

कालिदास कालामंदिरात एका कार्यक्रमात प्रमूख पाहुणा म्हणून त्यांची भेट झाली. सिंधूताई जे काही बोलायच्या त्यामागे कळकळ असायची. त्यांचे भाषण नसायचे तर तो एक संवाद असायचा. तो संवाद प्रत्येकाच्या मनाचा ठाव घ्यायचा. त्यांनी कधीच स्वतःसाठी काही मागितले नाही केले नाही जे केले ते केवळ अनाथांची माय म्हणून केले.

अजय बोरस्ते, विरोधीपक्ष नेता नाशिक , महानगरपालिका

सिंधुताईची व माझी पहीला भेट दैनिक देशदुतच्या गुणवंत गुणगौरव सोहळ्यातच पहील्यांदा झाली. त्यानंतर त्यांचे काम जवळून पाहिले. स्वताःचे दुःख बाजुला ठेऊन एखादी माऊली इतरांच्या दुखात कशी समरस होते आणि अनाथांच्या आयुष्याला वळण देते हे त्यांनी जगाला दाखवुन दिले. मतुम बेसहारा होे तो किसीका सहारा बनोया ओळी त्यांनी सार्थ ठरवल्या.

लक्ष्मण सावजी

वर्धा येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत असतांना माईसोबत भेटीचा योग आला. समाजाप्रती कळकळ, अनाथ मुलांबद्दल असणारे प्रेम या सर्व विषयांबाबत माईच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडले. विशेषत: मातृत्व, दातृत्व आणि कर्तृत्व याचा त्रिवेणी संगम म्हणजे माईंचे व्यक्तीमत्व. अजून एक महत्वाची बाब लक्षात आली माईचे गायींबदल असणारे विशेष प्रेम. माईंचा संघर्ष प्रत्येकासाठी एक प्रेरणादायी राहील.

प्रमोद पवार,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नंदुरबार.

माईंना पहिल्या भेटीत बघितले तर अंगावर काटा आला होता. गरुडाचे उदाहरण देऊन त्यांनी आमच्या पंखात बळ दिले होते. जीवनात कितीही संघर्ष आला तरी कसे जगायचे हे माईंनी शिकवले होते. माईंना प्राण्यांचा फार लळा होता. माझ्याकडे आल्या तेव्हा मांजराची पिल्लं हातात घेतली होती. किती तरी वेळ माझ्या मुलांशी गप्पा मारला होता.आई बापाला विसरू नका असे माझ्या मुलांना सांगितले होते.

नलिनी मधुकर कड-देशमुख

अनाथ मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आपले आयुष्य वेचणार्‍या सिंधुताई माणुसकीचा, प्रेमाचा, मायेचा जिवंत झरा होता.ङ्घखरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावेफ या जाणिवेतून सिंधुताईंनी अविरत काम केले. गरीब, अनाथ मुलांचे भविष्य घडविण्याबरोबरच त्यांच्या जीवनात त्यांनी आनंद पेरला. मानवतेच्या हृदयात प्रेमाचे अंकुर फुलवून सर्वांची ङ्गमायफ म्हणून स्थान मिळविले.

विश्वास ठाकूर,संस्थापक अध्यक्ष विश्वास को ऑप बँक

पुण्यात एका कार्यक्रमात ताईंची भेट झाली होती. त्यांच्याजवळ गेलो त्यांनी माझे नाव विचारून आस्थेने चौकशी केली. एका आईप्रमाणे प्रेमाचा हात माझ्या डोक्यावर ठेवला होता व आशीर्वाद दिले होते. मी त्यांना गुलाब पुष्प दिला होता. आजपर्यंत त्या भेटीची आठवण माझ्या मनात कायम आहे. त्या खुर्चीवर बसल्या होत्या व मी आईसारखा त्यांच्या पायाजवळ बसलो होतो.

- अख्तर शेख (नाशिक ढोल वाले)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com