ऐन थंडीत तापणार गावोगावी राजकारण

ऐन थंडीत तापणार गावोगावी राजकारण

निफाड । आनंदा जाधव | Niphad

तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या (gram panchayat) निवडणुकीसाठी (election) गावपातळीवर राजकारण (politics) तापण्यास सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी कुटुंबातच कलह निर्माण होऊ लागला आहे.

पॅनल निर्मितीसाठी (Panel creation) सत्ताधारी आणि विरोधक पुढे सरसावले असून गुप्त बैठका, भेटीगाठी, उमेदवारांची जमवाजमव, वॉर्डनिहाय मतदान (voting) आकडेवारी यांचा ताळमेळ घातला जाऊ लागला आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी (election) तरुणाईदेखील पुढे सरसावल्याने अनेक ग्रामपंचायतींमध्ये बहुरंगी लढतीचे संकेत मिळू लागले आहेत.

तालुक्यातील खडकमाळेगाव, नांदुर्डी, कोटमगाव, कसबे सुकेणे, पिंपळस रामाचे, शिंगवे, चांदोरी, साकोरे मिग, खानगावथडी, तारूखेडले, लोणवाडी, निमगाव वाकडा, थेटाळे, बोकडदरे, कोकणगाव, सोनेवाडी खुर्द, धारणगाव वीर, मांजरगाव, पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) आदी ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. अर्ज भरण्यासाठी दोन डिसेंबर ही अखेरची मुदत असल्याने तोपर्यंत हौसे, नवसे, गवशे मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करून पॅनलच्या नेत्यांवर दबाव टाकण्याची शक्यता आहे.

यातही तालुक्यातील सधन व मोठ्या असणार्‍या ग्रामपंचायतींकडे तालुक्यातील प्रमुख नेत्यांचे विशेष लक्ष लागून आहे. त्यामुळे पॅनलचे नेते वॉर्डनिहाय आणि जातीनिहाय तसेच कुटुंबनिहाय मतांची जुळणी करण्यात व्यस्त झाले आहेत. ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीने अनेक पक्षांमध्ये फाटाफुटीची लागण झाली असून गट आणि पक्ष बदलामुळे निष्ठेचे धुमारे गळून पडले आहेत.

विशेषत: चांदोरीत सिद्धार्थ वनारसे विरुद्ध संदीप टर्ले यांच्या गटातील सामना रंगणार आहे तर पिंपळगावला नगरपरिषदेमुळे निवडणूक होणार की नाही अशी द्विधा परिस्थिती असतानाही येथे तीन पॅनलच्या निर्मितीसाठीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. येथे आ. दिलीप बनकर (MLA Dilip Bankar) विरुद्ध भास्कर बनकर विरुद्ध सतीश मोरे यांच्या पॅनलमध्ये लढतीचे संकेत मिळत आहेत. मात्र येथे निवडणुका होण्याऐवजी नगरपरिषद दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी ग्रामस्थांची मागणी असतानाही ‘अभी नही तो कभी नही’ या इराद्याने नेते इर्षेला पेटले आहेत.

कोटमगावला भाऊसाहेब गांगुर्डे विरुद्ध तुकाराम गांगुर्डे यांच्यातील पारंपरिक लढती पुन्हा होण्याची शक्यता आहे. तर पिंपळसला सुरेशबाबा पाटील यांनी दोन प्रतिस्पर्धी एकत्र आणून ग्रामपालिकेत चमत्कार घडवून दाखवला होता. मात्र हे एकत्र आलेले नेते कधीही एकत्र राहिले नाही त्यामुळे यावेळी दोघांनी दोन स्वतंत्र वाटा चोखळल्या आहेत. परिणामी तानाजी पूरकर विरुद्ध विलास मत्सागर यांच्या पॅनलमध्ये येथे लढती रंगणार आहेत. तर शिंगवेत धोंडीराम रायते विरुद्ध गोकुळ गिते यांच्या पॅनलमध्ये लढत होण्याचे संकेत मिळत आहेत.

मांजरगावमध्ये मात्र नातेवाईकांमध्येच लढती रंगत आल्या असून यावेळीही त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. तर खडकमाळेगाव, नांदुर्डी, साकोरे मिग येथेही चुरशीच्या लढतीचे संकेत मिळत आहेत. एकूणच ग्रामपंचायतीच्या सत्ता हस्तगत करण्यासाठी गावपाटीलकीचा संघर्ष अधिक तीव्र होताना दिसू लागला असून पॅनल निर्मितीतून रूसवे-फुगवे, गटाची फाटाफूट मोठ्या प्रमाणात होऊन नव्याने समीकरणे उदयास येण्याची शक्यता आहे.

तर कसबे सुकेणेमध्ये नाना पाटील भंडारे, आनंदराव भंडारे विरुद्ध बाळासाहेब जाधव, विश्वास भंडारे यांच्या पॅनलमध्ये चुरशीची लढत होण्याचे संकेत मिळत असतानाच माजी उपसरपंच धनराज भंडारेदेखील तिसर्‍या पॅनलची निर्मिती करत असल्याची चर्चा होऊ लागल्याने यावेळचा कसबे सुकेणेचा रणसंग्राम चांगलाच गाजणार आहे. तर साकोरे मिगमध्ये बोरस्ते विरुद्ध बोरस्ते, कोकणगावमध्ये मोरे विरुद्ध मोरे, तारूखेडलेत जगताप विरुद्ध जगताप अशा भाऊबंदकीतच लढतीचे संकेत मिळू लागले आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा माहोल वाढत असतानाच ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीने वाडीवस्तीसह चौक आणि गल्लीबोळात निवडणुकीचीच चर्चा झडताना दिसू लागली आहे. साहजिकच या निवडणुकीने दीपावलीनंतर खर्‍या अर्थाने मतदारांची दिवाळी साजरी होणार असून सध्या तरी बैठका, भेटीगाठी, उमेदवारांची निश्चिती यांना वेग आला असून सत्ताधार्‍यांसह विरोधकांनीदेखील ग्रामपंचायतीची निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने ऐन थंडीत गावपाटीलकीचे राजकारण चांगलेच तापू लागले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com