कर्ज फेडल्यानंतरही सातबार्‍यावर बोजा

कर्ज फेडल्यानंतरही सातबार्‍यावर बोजा

कसबे सुकेणे। वार्ताहर Kasbe Sukene

मौजे सुकेणे Sukene येथील तत्कालीन गुरुदत्त उपसा जलसिंचन संस्थेला चांदोरी Chandori येथील इंडियन बँकेकडून वित्तपुरवठा करण्यात आला होता. सदरच्या कर्जाची परतफेड संस्था व शेतकर्‍यांनी करुन देखील शेतकर्‍यांच्या सातबारा उतार्‍यावरील बोजा गेल्या अनेक वर्षांपासून कायम असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

दरम्यान बँकेशी चर्चा केल्यानंतर बँकेकडे 1984 ते 2016 पर्यंतचे कर्जाबाबतचे दप्तर उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून सातबारा उतारा वरील कर्जाचा बोजा हटवावा व सर्व शेतकर्‍यांना कर्ज निरंक दाखले द्यावे. अन्यथा त्याबाबत बँकेसमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे.

मौजे सुकेणे येथील श्री बाणेश्वर महादेव मंदिरात चांदोरी येथील इंडियन बँक शाखेचे अधिकारी व मौजे सुकेणे येथील शेतकरी यांची बैठक संपन्न झाली. जि.प. सदस्य यतीन कदम, उपसरपंच सचिन मोगल आदींसह मौजे सुकेणे ग्रामस्थ उपस्थित होते. मौजे सुकेणे येथील गुरुदत्त उपसा जलसिंचन संस्थेला इंडियन बँकेने कर्ज पुरवठा केला होता. सदर कर्जाची परतफेड ही संस्थेच्या सभासद शेतकर्‍यांनी साखर कारखाना ऊस पेमेंट मधून तसेच काही शेतकर्‍यांनी रोख भरून तर सरकारकडून आलेल्या कर्जमाफीतून परतफेड ही इंडियन बँकेला करण्यात आली आहे.

कर्जाची परतफेड करून देखील इंडियन बँकेने सर्व सभासद शेतकर्‍यांच्या सातबारा उतार्‍यावरील कर्जाचा बोजा हा आजवर कायम ठेवला आहे. याबाबत मौजे सुकेणे येथील पीडित शेतकरी सातत्याने इंडियन बँकेकडे पाठपुरावा करत असून देखील इंडियन बँकेचे अधिकारी, वरिष्ठ अधिकारी दाद द्यायला तयार नाहीत. दरम्यान गेल्या महिन्यात मौजे सुकेणेचे उपसरपंच सचिन मोगल, भाजपचे यतीन कदम यांचेसह शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाने चांदोरी येथील इंडियन बँकेवर धडक मोर्चा नेत याविषयी जाब विचारला होता.

त्यावेळी संबंधित अधिकार्‍यांनी काही दिवसांची मुदत द्यावी, यावर मार्ग काढला जाईल असे आश्वासन दिले होते. त्यानुसार दीड महिना लोटला तरीही प्रश्न काही सुटत नसल्याने मौजे सुकेणे गावात इंडियन बँक चांदोरी शाखा अधिकारी व मौजे सुकेणे येथील शेतकर्‍यांची बैठक झाली. बैठकीत शेतकर्‍यांनी उपस्थित अधिकार्‍यांशी संवाद साधत बँकेने सर्व शेतकर्‍यांना सातबारा निरंक करून कर्ज नसल्याचा दाखला द्यावा अशी एकमुखी मागणी केली आहे.

गेल्या तीन दशकांपासून सदरचा प्रश्न भिजत पडला असून शेतकर्‍यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. इंडीयन बँकेने याविषयी त्वरित निरंक दाखले द्यावेत अन्यथा चांदोरी शाखेवर मौजे सुकेणे येथील शेतकरी तीव्र आंदोलन करतील असा इशारा मौजे सुकेणेचे उपसरपंच सचिन मोगल यांचेसह शेतकर्‍यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.