अश्वारूढ शिवपुतळ्याची प्रतिष्ठापना

शिवस्मारक जीर्णोध्दार; शिवशाही थाटात मिरवणूक
अश्वारूढ शिवपुतळ्याची प्रतिष्ठापना

अंबासन । प्रशांत भामरे Ambasan

येथील बसस्थानकाजवळ शिवस्मारकाचा जीर्णोध्दार (Renovation of Shivsmarak )करण्यात येवून भव्य अश्वारूढ पुतळ्याची प्रतिष्ठापना ( Statue of Chhatrapati Shivaji Maharaj )करण्यात आली. त्यानिमित्त संपूर्ण गाव सडा-रांगोळ्या, भगव्या झेंड्यांनी सुशोभित करण्यात आले होते. तसेच शिवशाही थाटात शिवरायांच्या प्रतिमेसह मशाल मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळनंतर लेझर शोसह आकर्षक विद्युत रोषणाई व ढोलताशांच्या गजरात पुतळा अनावरण सोहळा संपन्न झाला.

यापूर्वी अंबासन ( Ambasan ) बसस्थानकाजवळ सर्कलमधील चबुतर्‍यावर छत्रपती शिवरायांचा अर्धपुतळा होता. सहा महिन्यांपूर्वीच या शिवस्मारकाची दुरूस्ती करण्याऐवजी सुशोभिकरणासह जीर्णोध्दार करून भव्य अश्वारूढ पुतळा स्थापनेचा निर्णय शिवप्रेमी तरुणांनी घेतला. या निर्णयावर ग्रामसभा घेण्यात येवून शिक्कामोर्तब करण्यात आले. शिवस्मारकासाठी बाहेरच्या कुणाकडे वर्गणी न मागता स्थानिक ग्रामस्थ व नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेरगावी स्थायिक ग्रामस्थांचीच मदत घेण्याचा निर्णय झाला.

हा संकल्प मार्गी लावण्यासाठी शिवप्रतिष्ठान ग्रुप स्थापन करण्यात आला. या माध्यमातून निधी संकलन सुरू झाले. धुळ्याचे शिल्पकार समद भामरे यांना पुतळा निर्मितीचे तर दगडी बांधकामासाठी वाकडी, ता. धरणगाव, जि. जळगाव येथील गणेश पाथरवट यांना जबाबदारी सोपविण्यात आली. या दोन्ही कामांसाठी सुमारे 50 लाखांचा खर्च आला. अंबासनचे भूमिपुत्र व पुण्यात आर्किटेक्ट इंजिनिअर किरण भामरे व नामपूर येथील अविनाश सावंत यांनी अष्टकोनी आकारातील चौथर्‍यावर शिवरायांचा अश्वारूढ पुतळा स्थापन करण्याची योजना साकारली.

अश्वारूढ शिवपुतळा अनावरणाचा मुहूर्त निश्चित झाल्यानंतर स्थानिक दोनशे तरुणांनी साल्हेर किल्ल्यावरून प्रज्वलीत केलेली मशाल ज्योत अंबासन फाट्यावर आणताच फटाक्यांच्या आतषबाजीत मशालज्योतीचे स्वागत करण्यात आले व ढोलताशांच्या गजरात ज्योत शिवपुतळ्याजवळ आणून प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास प्रारंभ झाला. यावेळी होमहवन होवून महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानिमित्त प्रत्येक घरावर गुढ्या उभारण्यात आल्या तर सडा-रांगोळ्यांनी अंगणे सजली होती.

सायंकाळी गणेश महाराज शिंदे यांचे शिवचरित्रावर व्याख्यान होवून दुसर्‍या दिवशी सकाळी 9 वाजता शिवतीर्थापासून ढोलताशांच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत स्थानिकांसह बाहेरगावी स्थायिक झालेले ग्रामस्थही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रत्येकाने भगवे वस्त्र, भगवा फेटा परिधान केला होता. त्यामुळे संपूर्ण गावात शिवशाही अवतरल्याची अनुभूती येत होती. ढोलताशांच्या गजरात आणि अभुतपूर्व जल्लोषात दुपारी 4 वाजेपर्यंत पालखी मिरवणूक सुरू होती. दरम्यान, रक्तदान शिबिरासह रांगोळी स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.

सायंकाळी लेझर शोसह विद्युत रोषणाईच्या झगमगाटात व ढोलताशांच्या गजरात जायखेडा पोलीस ठाण्याचे एपीआय श्रीकृष्ण पारधी व नामपूर पोलीस दूरक्षेत्र कार्यालयाचे पीएसआय तुषार भदाणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलीत करून छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी शिवरायांच्या जयजयकाराने संपूर्ण गाव दणाणून गेले होते. रात्री 9 वाजता धर्मराज महाराज हांडे यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. स्थानिक ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ या ऐतिहासिक सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यात महिलांची संख्याही लक्षणीय होती.

Related Stories

No stories found.