दक्षिण गंगा गोदावरी प्राधिकरण स्थापन करा
नाशिक

दक्षिण गंगा गोदावरी प्राधिकरण स्थापन करा

पर्यावरणप्रेमींचे केंद्र, राज्याला साकडे

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राष्ट्रीय गंगा स्वच्छ मिशन अंतर्गत नमामि गंगे समितीची स्थापना करण्यात आली आहे, त्याच धर्तीवर नाशिक त्र्यंबकेश्वर येथून उगम पावलेल्या दक्षिण गंगा गोदावरी नदी स्वच्छतेसाठी केंद्र व राज्य शासनाने गोदावरी प्राधिकरणाची स्थापना करावी अशी मागणी नाशिक शहरातील पर्यावरण प्रेमींच्या संस्थांनी केली आहे.

नाशिककर पर्यावरण प्रेमी गोदावरी नदीसह नदीला जोडणार्‍या नद्या यांच्या स्वच्छतेसाठी एकत्र आले असून त्यांनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, कंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खा. हेमंत गोडसे, डॉ. भारती पवार आणि विभागीय आयुक्त यांना एक निवेदन पाठविले आहे. गंगा नदीप्रमाणे नाशिक त्र्ंयंबकेश्वर येथून उगम पावलेल्या नदी 1465 कि. मी.अंतराची असून ती देशातील चार राज्यांची जीवनदायी ठरलेली आहे.

गोदावरी नदी देशातील दुसरी मोठी नदी आहे. नदीच्या अरुणा संगमावर दर बारा वर्षांनी मोठा सिंहस्थ कुंभमेळा भरत असून देशभरातून भाविक मोठ्या संख्येने याठिकाणी येतात. मात्र अलीकडच्या काळात नदीत मोठे प्रदूषण झाले असून जिल्हा ते ग्रामपंचायत स्तरावर प्रदूषण मुक्तीकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. यामुळे नदी स्वच्छतेसाठी गोदवारी प्राधिकरणांची स्थापना करुन याद्वारे या नदीच्या स्वच्छतेसाठी व प्रदूषण मुक्तीसाठी निधी दिला जावा. मात्र हा निधी केवळ गोदावरी नदीसाठीच वापरण्यात यावा अशी मागणी पर्यावरणप्रेमींच्या संस्थांनी केली आहे.

उपोषणाला पाठिंबा

जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह व स्वामी सानंद यांचे शिष्य हे गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी मातृभवन हरिद्वार याठिकाणी 3 ऑगस्टपासून आमरण उपोषणाला बसले आहे. या उपोषणाला पाठिंबा म्हणून नाशिक मधील पर्यावरण संस्थांच्या पदाधिकार्‍यांनी 10 ऑगस्टला रामकुंड भागात एक दिवसाचा उपवास करीत पाठिंबा दिला. या उपवास कार्यक्रमात निशिकांत पगारे, योगेश बर्वे, दीपक बैरागी, सुनील परदेशी, रोहीत कानडे, उदय थोरात, सुदाम ताजनपुरे, प्रा. सोमनाथ मुठाळ अमित कुलकर्णी यादी सहभागी झाले होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com