इस्पॅलियर स्कूल रेडिओ
इस्पॅलियर स्कूल रेडिओ
नाशिक

इस्पॅलियर देणार स्कूल रेडिओद्वारे शिक्षण; असा आहे स्कुल रेडिओ

पहिली ते दहावी पर्यंतचा अभ्यासक्रम

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक | Nashik

करोनामुळे गेल्या पाच महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाल्यानंतर सध्या शाळांमधून ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी वेगवेगळे माध्यम वापरले जात असले तरी त्यात अनेक अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना परिणामकारकरित्या अध्ययन व अध्यापन करता यावे या हेतूने नाशिकच्या इस्पॅलियर स्कूलने अभिनव प्रयोग करत ऑनलाइन रेडिओ स्कूल ची निर्मिती केली आहे. ऑनलाइन शिक्षणाला पर्याय देत विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम कमी व्हावा आणि सर्वांपर्यंत शिक्षण पोहोचावे म्हणून तयार केलेल्या या रेडिओवरती प्री पायमरी ते दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमाचे तब्बल अडीच हजार भाग (एपिसोड) रेकॉर्ड करून उपलब्ध करून देण्यात आले आहे.

24 जून पासून सुरू झालेल्या या रेडिओच्या माध्यमातून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी जीवन कौशल्याचे अभ्यासक्रम तसेच शालेय शिक्षण ते धडे रेडिओवर ऐकलेले आहेत. एवढेच नव्हे तर कुटुंबातील पालक तसेच इतर सदस्यांनीही या रेडिओचा माध्यमातून सामान्य ज्ञानासह इतर माहिती जाणून घेतली आहे. रेडिओ या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण देण्याचा प्रयोग करणारी इस्पॅलियर स्कूल देशातील पहिली शाळा ठरली आहे.

प्रयोगशील शिक्षण आणि अनुभवातून शिक्षण या तत्त्वांवर आधारित विद्यार्थ्यांना सर्जनशील, कौशल्याधिष्ठित आणि प्रयोगशील शिक्षण देणाऱ्या

इस्पॅलियर स्कूलने अनुभवातून शिक्षण याचा पायाधरून बाल मेंदू विकासावर अनेक कार्यशाळा घेतल्या आहेत. कोरोना मुळे शाळा बंद असल्याने ऑनलाइन शिक्षणासाठी शाळेने स्कूल रेडिओची निर्मिती केली. शाळेतील इयत्ता आठवीच्या विद्यार्थी डिझाईन फॉर चेंज या प्रकल्प अंतर्गत (डीएफसी) च्या माध्यमातून दरवर्षी विविध नाविन्यपूर्ण प्रयोग करत असतात. या विद्यार्थ्यांच्या कल्पनेनुसार आता हा स्कूल रेडिओ आदिवासी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. महाराष्ट्रात साधारण पाच लाख आदिवासी विद्यार्थी आहेत. त्यातील एक ते दीड लाख विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन आहेत. त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा रेडिओ उपलब्ध करून दिला जाणार आहे.

असा आहे स्कूल रेडिओ

स्कूल रेडिओ मध्ये प्री पायमरी ते दहावीच्या अभ्यासक्रमांचा अंतर्भाव असलेल्या विविध 88 प्रोग्राम अंतर्गत अडीच हजार ऑडिओ रेकॉर्ड उपलब्ध करून देण्यात आली आहे. पाच-पाच मिनिटांपासून ते दहा मिनिटांचे एकूण अडीच हजार एपिसोड आतापर्यंत रेकॉर्ड केलेले आहेत. तसेच या रेडिओमध्ये परमवीर चक्र मिळालेले सर्व भारतीय सैनिक यांच्या गोष्टी आहेत. महाराष्ट्रातील किल्ल्यांबद्दल माहिती आहे. विविध कविता आहेत. ज्यामध्ये मंगेश पाडगावकर, कुसुमाग्रज तर कवी भूषण यांनी शिवाजी महाराजांवर केलेल्या कवितापर्यंत हे सर्व आहे.

स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी त्यांचे विचार ऐकण्याची संधी यात मिळेल. साने गुरुजींच्या गोष्टी यात आहेत. महात्मा गांधीजींची ऑटोबायोग्राफी आहे. गणिताचे पाढे, मराठी म्हणी, इंग्लिशच्या कविता, शास्त्रज्ञांची माहिती, भारतीय राज्यघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य असे पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमाबरोबरच सामान्य ज्ञान आणि जीवन कौशल्य ची माहिती याद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या ऑनलाइन रेडिओ वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला फक्त आधी रेकॉर्ड केलेल्या क्लिप्स ऐकवता येतील असे नसून तुम्हाला लाईव्ह रिअल टाइम मध्ये सुद्धा रेडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत आपला आवाज पोचवता येतो. त्यामुळे येच्यावर विविध मान्यवरांचे लाईव्ह भाषण सुद्धा आयोजित करता येतात. आतापर्यंत पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील, जिल्हाधिकारी सुरेश मांढरे, जागतिक विचारवंत संदीप वासलेकर, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ रमेश पानसे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे.

स्कूल रेडिओ विद्यार्थ्यांसह सर्वांनाच फायदेशीर

लॉकडॉऊनमध्ये एप्रिल आणि मे या दोन महिन्यात सर्व शिक्षकांना रेडीओ साठी कसे व्हॉइस रेकॉर्ड करायचे याचे प्रशिक्षण दिले. रेकॉर्डिंग स्टुडिओ तसेच घरून मोबाईलवरून ऑडियो क्लिप्स बनवल्या. रेडिओचा प्रयोग यशस्वी झाल्याने आता आदिवासी विद्यार्थ्यांना हा स्कूल रेडिओ उपलब्ध करून दिला जाणार आहे. महाराष्ट्रातील सर्व आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत आदिवासी विकास महामंडळातर्फे स्कुल रेडिओ पोहोचविण्यात येत आहे.

- सचिन जोशी, इस्पॅलियर स्कूल

आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत स्कूल रेडिओ पोचविणार

शाळा बंद असल्याने आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहे. याचाच एक भाग म्हणून इस्पॅलियर स्कूल ने तयार केलेला स्कूल रेडिओ सर्व आदिवासी विद्यार्थ्यांना पर्यंत पोहोचविला जाईल, ग्रामपंचायत, शिक्षक व विद्यार्थ्यांना या स्कूल रेडिओ उपलब्ध होईल तसेच आदिवासी विभागाच्या एकलव्यच्या शाळांमध्येही हा रेडिओ उपलब्ध करून दिला जाईल.

- किरण कुलकर्णी, आयुक्त, आदिवासी विकास विभाग

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com