निमा हाऊस
निमा हाऊस
नाशिक

निमात सत्तेसाठी उद्योजकांची रस्सीखेच

रविवार ठरणार संघर्षदिन

Abhay Puntambekar

सातपूर । प्रतिनिधी Satpur

नाशिक औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांची संघटना म्हणून ‘निमा’चा लौकिक आहे. मात्र विद्यमान पदाधिकारी आणि माजी अध्यक्षांची समिती (बीओटी) यांच्यातील विसंवाद विकोपाला गेला असून विद्यमान पदाधिकार्‍यांची मुदत ३१ जुलै रोजी संपल्यानंतर त्यांना मुदतवाढ न देता ‘बीओटी’ने नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष व खजिनदार यांची नेमणूक केली असल्याने नवा पेच निर्माण झाला आहे. त्याचवेळी विद्यमान पदाधिकार्‍यांनी पदभार सोडण्यास नकार देत निमाच्या घटनेलाच आव्हान दिले आहे.

निमाचे विद्यमान पदाधिकारी यांची मुदत निमाच्या घटनेनुसार ३१ जुलै रोजी संपली आहे. त्यानंतरच्या कार्यक्रमासाठी कोविडच्या प्रादुर्भावामुळे निवडणुका होऊ शकल्या नाहीत सोबतच वार्षिक सर्वसाधारण सभा ही घेता येत नसल्याने हंगामी कार्यकारी मंडळाची नेमणूक करणे गरजेचे होते. या पार्श्वभूमीवर विद्यमान पदाधिकार्‍यांनी धर्मादाय आयुक्तांकडे मुदतवाढ देण्यासाठी प्रस्ताव दाखल केला होता.

मात्र या पदाधिकार्‍यांच्या प्रस्तावाला मान्यता न मिळाल्याने माजी अध्यक्ष कमिटीने नव्या पदाधिकार्‍यांची निवड केली आहे. विद्यमान अध्यक्षपदावर सोडण्यास तयार नसल्याने नव्या पेचप्रसंगामुळे निमाच्या कार्यालयात दोन अध्यक्ष काम करणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

दरम्यान पेचप्रसंगात वादविवादाचे क्षण निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन विद्यमान पदाधिकार्‍यांनी सातपूर पोलीस ठाण्यात पोलीस बंदोबस्ताची मागणी करणारे पत्र दिले आहे. माजी अध्यक्ष समिती फक्त बीओटीने नूतन कार्यकारी मंडळ घोषित केले असून त्यात अध्यक्षपदी विवेक गोगटे, तर सरचिटणीस पदी आशिष नहार तसेच खजिनदार पदावर संदीप भदाणे यांची निवड करण्यात आली आहे.

नवडणुका घेण्याचा कार्यक्रम सुरू झाल्यामुळे माजी अध्यक्ष समितीला अधिकार उरलेला नाही. त्यामुळे त्यांनी केलेल्या नव्या पदाधिकार्‍यांची निवड बेकायदेशीर असून, आपण उद्यापासून नियमितपणे काम पाहणार आहोत. कार्यकाळ संपत असला तरी मुदतवाढ देण्यासाठी धर्मादाय आयुक्तांकडे अर्ज दाखल केलेला आहे. ते न्यायालयच असल्याने हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे मी मानतो.

शशी जाधव, विद्यमान अध्यक्ष-निमा

निमाच्या कार्यकारी मंडळाची निवड ही वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर होत असते. त्यानंतर महिन्याभरात कार्यकारी मंडळाची बैठक होऊन त्यानुसार माजी अध्यक्ष समितीच्या एका सदस्याच्या निवडीसाठी बैठक घेतली जाते. त्या बैठकीनंतर बीओटी अध्यक्षाची निवड केली जाते. त्यामुळे या निवडीपर्यंत ही कमिटी कार्यरत असून या समितीकडे घटनेप्रमाणे सर्वाधिकार असल्याने आम्ही नवीन विशेष कार्यकारी मंडळाची निवड केली आहे. सर्व नेमणुका या घटनेच्या आधारावर करण्यात आल्या आहेत.

मनीष कोठारी, अध्यक्ष-बीओटी

रविवार ठरणार संघर्षदिन

रविवारी (दि. 2) निमाच्या नूतन पदाधिकार्‍यांचा कार्यकाळ सुरू होणार आहे. त्यामुळे आपल्या पदाचा पदभार घेण्यासाठी हे पदाधिकारी ‘निमा’त येण्याची शक्यता आहे. त्याचवेळी विद्यमान पदाधिकार्‍यांनी पदभार देण्यास विरोध दर्शवलेला असल्याने आज संघर्षाचे क्षण उद्भवण्याची शक्यता व व्यक्त केली जात आहे.

Deshdoot
www.deshdoot.com