
नाशिक | प्रतिनिधी
जिल्ह्यातील आणि विशेषतः सिन्नर,दिंडोरी आणि इगतपुरी तालुक्यातील उद्योजकांनी (Entrepreneurs)महावितरणचे (MSEDCL) मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्यासमोर विद्युत खात्याच्या समस्यांचा पाढाच वाचला. ८ दिवसांच्या आत या समस्यांचे निराकरण न झाल्यास उद्योग बंद ठेवण्याचा इशारा त्यांनी दिल्यानंतर हे प्रश्न तातडीने मार्गी लावू,असे आश्वासन कुमठेकर यांनी दिल्याने उद्योजकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.
उद्योग जगतासाठी विजेचा पुरवठा अखंडपणे सुरू राहणे गरजेचे असते. परंतु अनेकदा पूर्वसूचना न देता वारंवार विद्युत पुरवठा खंडित करण्यात येतो. शटडाऊनचे प्रकारही घडत असल्याने जिल्ह्यातील उद्योजकांनी महावितरण खात्याच्या गलथान कारभाराबद्दल जोरदार टीकास्त्र सोडून या सर्व समस्यांचे निराकरण व्हावे अशी मागणी त्यांनी निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्याकडे केली.
याबाबत तातडीने महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्याशी संवादाचा कार्यक्रम बुधवारी निमा कार्यालयात आयोजित केला होता. व्यासपीठावर निमाचे उपाध्यक्ष आशिष नहार, सचिव राजेंद्र अहिरे, रवींद्र झोपे, दिंडोरीचे को चेअरमन योगेश पाटील,सिन्नर विकास समितीचे चेअरमन किरण वाजे, प्रवीण वाबळे तसेच महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, कार्यकारी अभियंता राजाराम डोंगरे आदी होते.
या बैठकीत सिन्नर, दिंडोरी तसेच इगतपुरी तालुक्यातील उद्योजक आक्रमक असल्याचे चित्र दिसले. माळेगाव एमआयडीसीत सब स्टेशनसाठी जागा उपलब्ध करून दिली असून तेथे काम सुरू करावे, ३ फिडरचे ब्रेकर बदलावे,जे डीपी बॉक्स गंजले आहेत ते बदलून नवीन टाकावेत,मनुष्यबळ वाढवावे मेंटेनन्ससाठी मोठ्या प्रमाणात साहित्य उपलब्ध करून द्यावे तसेच विद्युत पुरवठा विनाखंड सुरू रहावा आदी मागण्यां मांडून सिन्नरच्या उद्योजकांनी मुख्य अभियंत्यांना कोंडीत पकडले. याप्रकरणी कुमठेकर यांनी त्या परिसरातील अभियंत्यांची चांगलीच हजेरी घेतली.
उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी चांगले फैलावरही घेतले.उद्योजकांच्या न्याय्य मागण्या तातडीने सोडविल्या जातील असे आश्वासन कुमठेकर यांनी दिले. एका उद्योजकाने तर वीस वर्षांपूर्वीची रिकव्हरी काढल्याची धक्कादायक माहिती बैठकीत सादर केली तेव्हा ही बाब तपासण्यात येईल आणि आवश्यकता वाटल्यास त्यात सुधारणा केली जाईल असे आश्वासन कुमठेकर यांनी यावेळी दिले.
दिंडोरी तालुक्यातील उद्योजकांनी पैसे भरूनही कनेक्शन मिळत नाही तसेच सातत्याने विद्युत पुरवठा खंडित होतो.बोरगडला नवीन स्टेशन सबस्टेशन सुरू होऊनही विद्युत पुरवठ्यात म्हणावं तसं फरक पडलेला नाही आदी तक्रारी केल्या.एका उद्योजकाने आपले औद्योगिक युनिट असतानाही महावितरणने कमर्शियल प्रमाणे तब्बल २८ लाख रुपये बिल पाठविल्याचे निदर्शनास आणले.अकरा वर्षांपासून या उद्योजकाची फॅक्टरी आहे.
असे असतानाही त्याला कमर्शियल रेटने बिल पाठविण्या मागचे कारण काय सवाल निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांनी केला असता त्याची सत्यता पडताळून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन कुमठेकर यांनी दिले. दिंडोरी तालुक्यातील लखमापुर,खतवड,तळेगाव औद्योगिक वसाहतींसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्या तळेगाव येथे शंभर खाजगी उद्योग थाटण्यात आले असून त्यांना नवीन कनेक्शन द्यायला विलंब का होतो अशी विचारणा बेळे यांनी केली असता या प्रकरणात जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन कुमठेकर यांनी दिले. इगतपुरी तालुक्यातील गोंदे आणि वाडीवऱ्हे येथील उद्योजकांनीही आपल्या समस्यांना वाट मोकळी करून दिली.
आमच्या भागात तर १६ /१६ तास वीज खंडित होते असे गोंदे येथील उद्योजकांनी सांगताच गोंदे येथे नवीन सबस्टेशन प्रस्तावित असून लवकरच या प्रश्नाचे निराकरण होईल असे आश्वासन कुमठेकर यांनी दिले. अंबड आणि सातपूर येथील उद्योजकांचे प्रलंबित प्रश्नही सोडविण्यात येतील असेही ते म्हणाले.
यावेळी राजेंद्र वडनेरे, मिलिंद रजपूत, दिलीप वाघ गोविंद झा,मनिष रावल,श्रीकांत पाटील,संदीप भदाने, सुधीर बडगुजर,संजय महाजन,कैलास पाटील,बबन चौरे,सचिन कंकरेज, किरण करवा,विश्वजीत निकम, रावसाहेब रकिबे,सुनील जाधव,विजय जोश,देवेंद्र विभुते, नितीन धात्रक यांच्यासह जिल्ह्यातील उद्योजक आणि महावितरणचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.