विल्होळी अंबड लिंक रोडवर उद्योजकांचे आंदोलन

रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी दयनीय अवस्था
विल्होळी अंबड लिंक रोडवर उद्योजकांचे आंदोलन

नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik

विल्होळी ते अंबड औद्योगिक वसाहतीकडे ( Vilholi To Ambad Industrial Area Road ) जाणाऱ्या लिंक रोडवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने ( Pits On Road )संतप्त होत येथील उद्योजकांनी खड्ड्यात उतरून आंदोलन केले.

विल्होळी ते अंबड औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या लिंक रोडवर सुमारे 100 उद्योजकांची या ठिकाणी औद्योगिक वसाहत आहे, दरम्यान येथील उद्योजक हे शासनाचे मालमत्ता कर, वस्तू सेवा कर व अन्य कर देत असून देखील या ठिकाणी गेल्या कित्येक वर्षांपासून रस्ताच उपलब्ध नसल्याने मुखत्व करून पावसाळ्यात येथील उद्योजकांना व कामगारांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी मालाची देवाणघेवाण करण्याकरिता कुठलेही वाहतूकदार येण्यास खराब रस्त्यामुळे टाळाटाळ करत आहेत.

परिणामी येथील उद्योजकांना जादा पैसे अदा करून आपल्या मालाची वाहतूक करावी लागत आहे. या ठिकाणी सुमारे तीन ते चार हजार महिला व पुरुष कामगार आपल्या कुटुंबाची उपजीविका चालविण्याकरता रोजगारासाठी दररोज येत असतात. सदरहू रस्त्यावरून जात असताना बऱ्याचदा दुचाकी घसरून अपघातांना येथील कामगारांना सामोरे जावे लागलेले आहे

या घटनेची नोंद जरी कुठल्या पोलीस ठाण्यात नसली तरी या ठिकाणी घडलेले किरकोळ अपघात ही गोष्ट खरी असल्यामुळे संतप्त होत येथील उद्योजकांनी रस्त्यावर उतरत (दि.१२) गुरु गजानन इंडस्ट्रियल परिसरातील तब्बल 30 ते 40 उद्योजकांनी रस्त्यावरील खड्ड्यात उतरत आंदोलन केले तसेच संबंधित विभाग स्थानिक आमदार यांनी या प्रश्नाकडे लक्ष देऊन रस्त्याचा प्रश्न मार्गी लावा अशी मागणी उद्योजकांसह कामगार वर्गाने केली. यावेळी माजी सरपंच बाजीराव गायकवाड, उद्योजक कैलास धांडे, नितीन खताळे, सादिक सुरानी, गोविंद डुबेवार, सचिन भकडवारे, अतुल बेंडाळे, प्रतीक अवणकर,भांड, जितेंद्र घोडराव, भोजने, निकम, अमृतकर, कुलकर्णी आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com