दे. कॅम्प | Deepali Camp

गेल्या 8 महिन्यापासून बंद असलेली कॅन्टोमेन्टची अद्ययावत जिम आता खुली करण्यात आल्याने येथील युवकांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान यासाठी प्रशासनाने काही अटी शर्थी घातल्या असून त्याचे पालन होणे गरजेचे असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांनी सांगितले.

आरोग्यासाठी पोषक वातावरण असलेल्या देवळाली कॅम्प शहरात खासगी जिमचे वाढलेले दर हे सर्वसामान्यच्या आवाक्यात नसल्याने युवकांनी केलेली मागणी लक्षात घेऊन बोर्डाचे उपाध्यक्ष सचिन ठाकरे यांनी वॉर्ड क्रमांक 2 मध्ये सर्व नगरसेवक तसेच बोर्डाचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांच्या सहकार्यातून तब्बल 60 लाख रुपये खर्चाची अद्ययावत जिमची उभारणी केली. खा. हेमंत गोडसे यांचे हस्ते तिचा लोकार्पण सोहळा झाला होता. मात्र करोना महामारी व लॉकडाऊनमुळे तब्बल 8 महिने जिम बंद होती.

दरम्यान केन्द्र व राज्य सरकारने दिलेल्या निर्देशानुसार दि.1 डिसेंबरपासून जिम खुली करण्यात आली आहे. या ठिकाणी सर्व अद्ययावत साहित्य असून तज्ज्ञ प्रशिक्षकाची नेमणूक केली आहे.

या जिमचा युवकांनी लाभ घेताना दिलेल्या निर्देशाचे पालन करण्याचे आवाहन बोर्ड उपाध्यक्ष सचिन ठाकरे यांनी केले आहे.