
लासलगाव | वार्ताहर
येथील परिसरात पावसाने दडी मारल्यामुळे पाण्याअभावी शेतात उभे सोयाबीनचे पीक करपून गेल्याने संतप्त झालेल्या तरुण शेतकऱ्याने नऊ एकरवरील सोयाबीनच्या पिकावर रोटर फिरवून संपूर्ण पीक भुईसपाट केले.
येथील हर्षद होळकर या तरुण शेतकऱ्याने गेल्यावर्षी नऊ एकरावर सोयाबीनचे पीक घेत साडेतीन ते चार लाख रुपयांचे भरघोस उत्पन्न मिळविले होते. त्यानुसार यंदाही सोयाबीन पिकातून चांगले उत्पन्न मिळेल या आशेने सोयाबीन पिक करण्याचा निर्णय घेतला आणि सुरुवातीला झालेल्या रिमझिम पावसावर सोयाबीन पिकांची पेरणी केली.
पाऊस कमी असल्याने दुबार पेरणी करत सोयाबीनचे पिक घेतले मात्र पावसाने सलग ५० दिवस दडी मारल्यामुळे पाण्याअभावी सोयाबीनचे पीक करपू लागल्याने शेंगा आल्या नाहीत. एक लाख रुपये खर्च केलेल्या या सोयाबीन पिकाचे करायचे काय, असा मोठा प्रश्न समोर उभा असताना गेल्या आठवड्यात रिमझिम पाऊस झाला.
मात्र, याचा काहीच फायदा न झाल्याने हताश झालेला हर्षद या तरुण शेतकऱ्याने नऊ एकर क्षेत्रावरील सोयाबीन पिकावर रोटरी फिरवण्याचा निर्णय घेत त्याने आज रोटर फिरून संपूर्ण पीक भुईसपाट करत सरकारने दुष्काळ जाहीर करत शेतकर्यांना भरघोस मदत करावी, तसेच सक्तीची कर्ज वसुली थांबवण्याची मागणी केली आहे.